Tue, Sep 29, 2020 09:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रशासनात फेरबदल्यांचे वारे सुरू !

प्रशासनात फेरबदल्यांचे वारे सुरू !

Last Updated: Dec 07 2019 2:23AM
मुंबई : उदय तानपाठक

फडणवीस सरकारच्या काळातील अनेक प्रकल्पांचा फेरआढावा घेण्यासोबतच आता त्यांच्या काळातील पॉवरफुल्ल अधिकार्‍यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी सुरेश काकाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोक्याच्या ठिकाणी आपले अधिकारी बसवण्यासाठी आता ठाकरे सरकारमधील पार्टनर्समध्ये चढाओढ सुरू होणार आहे.   

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी या देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील म्हणून ओळखल्या जातात. त्यांना हटवण्यासाठी सेनेतून अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. त्यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव आणण्याच्या हालचालीदेखील शिवसेनेतून सुरू होत्या. आठच दिवसांपूर्वी त्यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. जोशी यांना समग्र शिक्षा अभियानात प्रकल्प संचालकपदावर नेमण्यात आले आहे. अश्विनी जोशींच्या जागी बदली झालेले महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी हे आता मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून आले आहेत.

याखेरीज मुंबई महापालिकेतील अनेक अधिकार्‍यांच्या बदल्या येत्या काही दिवसांत. होण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील सहआयुक्त सुमन चंद्रा यांची बुलडाण्याच्या जिल्हाधिकारीपदी नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, माजी मंत्र्यांचे खासगी सचिव आता मोकळे झाले असून, नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडे आपली वर्णी लागावी यासाठी आतापासूनच या अधिकार्‍यांचे लॉबिंग सुरू झाले आहे. मात्र, नव्याने मंत्री झालेल्या मंत्र्यांचे जुने अधिकारीही पुन्हा एकदा मंत्रालयात येण्यासाठी सक्रिय झाले आहेत. माजी मंत्र्यांकडील अन्य कर्मचारीवर्गदेखील आतापासून संभाव्य मंत्र्यांकडे फेर्‍या मारू लागला आहे.

 "