Thu, Oct 01, 2020 17:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तात्या टोपेंच्या स्मारकाला विरोध करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

तात्या टोपेंच्या स्मारकाला विरोध करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

Last Updated: Jul 14 2020 10:11PM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

शेत जमिनीवर स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे यांचे स्मारक उभारण्यात येत असून स्मारकाची जागा बदलण्यात यावी अशी मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्यांला मुंबई उच्च न्यायालयाने आज दिलासा देण्यास नकार दिला. स्मारकाच्या निविदेबाबत  प्रशासनाने जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर तब्बल वर्षा नंतर याचिकाकर्त्यांने आक्षेप घेतल्याचे स्पष्ट करत हायकोर्टाने याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे येवल्यात स्वातंत्र्य सैनिक तात्या टोपे यांचे स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

येवला नगरपरिषदेच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक तात्या टोपे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. मात्र हे स्मारक शेत जमिनीवर उभारण्यात येणार असल्याचा दावा करत सामाजिक कार्यकर्ते आनंद शिंदे यांनी या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. डिसेंबर २०१७ साली या स्मारकाला परवानगी मिळाली असून राज्याचे पर्यटन विभाग आणि केंद्र सरकारकडूनही या स्मारकाला मंजुरी मिळाली आहे. एवढेच काय तर स्मारकासाठी २.५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. याची दखल घेत खंडपीठाने याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार दिला व त्यांची मागणी अमान्य करत याचिका फेटाळून लावली.

 "