Tue, Mar 02, 2021 10:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोविड सेंटरमध्ये औषधांचा तुटवडा?

कोविड सेंटरमध्ये औषधांचा तुटवडा?

Last Updated: Nov 22 2020 2:20AM
मुंबई : तन्मय शिंदे

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असताना पालिकेच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये मुख्य औषधांचा तुटवडा असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यासाठी औषधांच्या खरेदीसाठी असलेली वेळखाऊ यंत्रणा आणि सप्टेंबरपासून या औषधांच्या खरेदीसाठी निश्चित केलेले मूल्य कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. 

शहरातील मुख्य पाच जम्बो केंद्रांतील अत्यावश्यक औषधे व संरक्षक किट जवळजवळ संपली आली आहेत. यात बीकेसी, एनएससीआय, गोरेगाव आणि दहिसर अशा जम्बो कोविड केंद्रांचा समावेश आहे. या कोविड केंद्रांतील अधिकार्‍यांना याबद्दल विचारले असता, पालिकेने सुरू केलेली खरेदी प्रणाली वेळखाऊ असून आणि आपत्कालीन खरेदीवर मासिक 40,000 रुपयांचा निर्बंध आणल्यामुळे खरेदी करण्यातील अडचणी वाढल्या असल्याचे ते सांगतात. गोरेगाव आणि दहिसर येथील केंद्रे बीकेसीतील कोविड केंद्रांकडे औषधे व संरक्षक किटची मागणी करत आहेत. त्यांना मिळणारी औषधे व कोविड संरक्षक किटचा साठा फक्त पाच ते सहा दिवस पुरेल इतकाच आहे. 

या संदर्भात जम्बो सेंटरच्या संचालकांनी बुधवारी पालिकेच्या अधिकार्‍याला यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे . ज्यामध्ये त्यांनी ही सर्व परिस्थिती स्पष्ट केली आहे. त्यात सध्या कोविड रुग्ण कमी असताना पाच जम्बो केंद्रांव्यतिरिक्त मरोळ येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटल देखील मूलभूत औषधे आणि पीपीई किट्स मिळविण्यासाठी धडपडत आहे. तर बाकी कोविड केंद्रांत आठवडाभर पुरेल इतकाही साठा शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे कोविडची दुसरी लाट आल्यास ही परिस्थिती हाताळणे अवघड होणार आहे याकडे पालिकेने कटाक्षाने लक्ष द्यावे, अशी माहिती असल्याचे महानगरपालिकेतील एका अधिकार्‍याने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले.

गेल्या महिन्यापासून संचालकांनी सीपीडीला आवश्यक औषधे, पीपीई किट्स, मास्क आणि इतर वस्तू त्वरित पुरवण्यासाठी वारंवार स्मरणपत्रे दिली. मात्र आजतागायत या कोरोना केंद्रांना कोणताही नवीन पुरवठा मिळालेला नाही. यासाठी ही वेळखाऊ ई-टेंडरिंग सिस्टीम कारणीभूत आहे.

व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी-3, झिंक, डॉक्सिसाइक्लिन, इव्हर्मेक्टिन, सायक्लोपॅम, मेटफॉर्मिन, लेव्होफ्लेक्स, फेविपीरावीर आणि इन्सुलिन यांचा अत्यावश्यक औषधांमध्ये सहभाग आहे. या औषधांचा पुरवठा या पाच कोविड केंद्रांना पुरेशा प्रमाणात होत नाही. या औषधांव्यतिरिक्त, प्रत्येक जम्बो सेंटरच्या डॉक्टरांनी सांगितले की, पुढील महिन्यासाठी त्यांना पीपीई किट, एन-95 मास्क, थ्री-प्लाय मास्क आणि डिस्पोजेबल कॅप्सची आवश्यकता लागणार आहे. गोरेगाव केंद्रात 300 कोविड रुग्ण असून त्यातील 30 हे आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे औषधे न मिळाल्यास उपचार करायचे तरी कसे, असा सवाल डॉक्टर विचारात आहेत. ई-निविदा घेण्यास बराच वेळ लागतो, परंतु दुसरीकडे येणारी लाट लक्षात घेता आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहोत, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

टॉसिलीझुमबच्या एका इंजेक्शनची किंमत 30,000 रुपये आहे. अगदी 100 रुग्णांसाठी मूलभूत अँटिबायोटिक्सची खरेदी केल्या तरी त्याची किंमत 1 लाख रुपयांच्या जवळपास जाते. राज्य सरकार आणि पालिकेकडून कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याने सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु पुरेशी औषधे नसल्याने सध्या असलेल्या रुग्णांचे व्यवस्थापन करणे अवघड झाले आहे. प्रत्येक जम्बो केंद्रात पुढील महिन्यात 36,000 पीपीई किट, 15,000 एन-95 मास्क , 30,000 थ्री-प्लाय मास्क आणि कमीतकमी 30,000 डिस्पोजेबल कॅप्सची आवश्यकता आहे, त्यामुळे पालिकेच्या संबंधित विभागाने कार्यवाही करण्याची गरज आहे.