Mon, Aug 10, 2020 20:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पुरेशा निधीअभावी कामे खोळंबली

पुरेशा निधीअभावी कामे खोळंबली

Last Updated: Jul 10 2020 1:39AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

शिवसेनेकडे असलेल्या खात्यांना पुरेसा निधी मिळत नसल्याची तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गुरुवारी केली. शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर बोलावली होती. या बैठकीत त्यांनी आपल्या मंत्र्यांच्या खात्यांचा आढावा घेतला. याचवेळी पारनेरसारखे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचनाही ठाकरे यांनी केल्याचे समजते.

पारनेरचे नगरसेवक राष्ट्रवादीने फोडल्यानंतर उद्धव ठाकरे नाराज झाले होते. त्यानंतर शरद पवार यांना ‘मातोश्री’वर जाऊन त्यांची समजूत काढावी लागली आणि दुसर्‍याच दिवशी ते नगरसेवक पुन्हा शिवसेनेत परतले. या पार्श्‍वभूमीवर आपल्या पक्षाच्या मंत्र्यांची तातडीची बैठक मुख्यमंत्र्यांनी मुंबईत घेतली. या बैठकीसाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री अनिल परब, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई आदी मंत्री उपस्थित होते. अन्य मंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाल्याचे सांगण्यात आले. या बैठकीनंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले  की, मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतला. या बैठकीला पालकमंत्रीदेखील उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आणखी काय उपाययोजना करता येतील, याबाबत चर्चा झाली. 

दरम्यान, या बैठकीत पारनेरबाबत काही चर्चा झाली का? असा प्रश्‍न विचारला असता, पारनेरचे पाचही नगरसेवक पुन्हा शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे तो विषय संपला आहे. आघाडीत अशा कुठल्याही घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली आहे, असे त्यांनी सांगितले.