Sat, Aug 08, 2020 12:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मित्रपक्षांनाही विचारात घ्या

मित्रपक्षांनाही विचारात घ्या

Last Updated: Jul 04 2020 12:59AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारमुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबईसह विविध शहरांमध्ये लॉकडाऊन करताना वेगवेगळे नियम लागू केल्याने तसेच संबंधित मंत्र्यांना विचारात न घेतल्याच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी सरकार चालवताना मित्रपक्षांनाही विचारात घ्या, असा सल्ला दिला असल्याचे समजते.

दादर येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकात सुमारे एक तास ठाकरे आणि पवार यांची बैठक झाली. काँग्रेसच्या मंत्र्यांपाठोपाठ राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही मुख्यमंत्री परस्पर निर्णय घेत असल्याची खंत व्यक्‍त केली होती. शुक्रवारी थेट शरद पवार यांनीच मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतल्याने या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

राज्यातील महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद होणार नाहीत, यासाठीची जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून आपण घ्यावी. तर सरकार म्हणून निर्णय घेत असताना आपल्या सहकारी पक्षांना विश्‍वासात घेणे आवश्यक असते. अन्यथा त्यामुळे गैरसमज पसरतात. राज्यात जाहीर करण्यात आलेल्या नवीन लॉकडाऊनमुळे अनेक मंत्री आणि नेते नाराज झाले असून ती नाराजी आपण दूर करावी. त्यांना विश्‍वासात घ्यावे, असा सल्लाही पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचे सांगण्यात आले.

राज्यात लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भातील निर्णय जाहीर करताना गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्याची कुणकुणही लागली नाही याबद्दल पवार यांनी या बैठकीत नाराजी व्यक्‍त केल्याचे समजते.राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर बैठकीत चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत असले तरी आघाडीतील नेते आणि त्यांची नाराजी हाच प्रमुख विषय या बैठकीत होता, असेही बोलले जात आहे.