Fri, Feb 26, 2021 06:08
पती जितका सुखात असेल, तितकेच सुख पत्नीलाही हवे

Last Updated: Feb 24 2021 9:56AM

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

पत्नी  जरी विभक्त राहत असेल तरी तिला पतीसारखेच सुखात राहण्याचा अधिकार आहे. ती पतीइतक्याच सुखात जगण्याची हक्कदार आहे. त्यासाठी  पतीने पत्नीला तेवढ्याच प्रमाणात पोटगी द्यायला हवी, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सत्र न्यायालयाने  दिला. दिंडोशी सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. यू. बघेले यांनी एका व्यावसायिक पतीला ही जाणीव करून देत दंडाधिकारी न्यायालयाने व्यावसायिकाच्या पत्नीला दरमहा 50 हजारांची पोटगी मंजूर  करण्याच्या निर्णयावर हस्तक्षेप करत पतीची याचिका फेटाळून लावली.

दंडाधिकारी न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी जुहू येथील व्यावसायिकाला  विभक्त झालेल्या पत्नीला  50 हजारांची पोटगी देण्याचे आदेश दिले. त्या विरोधात व्यावसायिकाने दिंडोशी न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. यू. बघेले यांच्यासमोर सुनावणी झाली.यावेळी व्यावसायिकाच्या वतीने केंद्र सरकारने जीएसटीची अंमलबजावणी केली, तेव्हापासून व्यवसायात प्रचंड तोटा सोसावा लागला आहे, असे कारण पुढे करीत पतीने पत्नीला जास्त पोटगी देण्यास नकार दिला.

त्यावर न्यायालयाने पतीच्या उत्पन्नाची जुनी कागदपत्रे तपासली. तसेच पती व त्याच्या आईवडिलांच्या सेवेला तीन नोकर आहेत. यावरून त्यांच्या सुखनैव जीवनशैलीची प्रचिती येते, असे निरीक्षण नोंदवले.

तसेच  पत्नीला पुरेशी पोटगी मागण्याचा अधिकार असल्याचे मत नोंदवत पत्नीलाही अशाच प्रकारे जीवन जगण्याचा हक्क आहे. पतीला व्यवसायात तोटा झाला म्हणून त्याचे परिणाम पत्नीला भोगावे लागू नयेत. व्यवसायातील तोटा हा पत्नीच्या सुखी जगण्याच्या हक्काच्या आड येता कामा नये, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा  सत्र न्यायालयाने दिला.