Wed, May 19, 2021 05:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात काही ठिकाणी आजपासून शाळा उघडणार

राज्यात काही ठिकाणी आजपासून शाळा उघडणार

Last Updated: Nov 23 2020 2:12AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुमारे आठ महिने बंद ठेवण्यात आलेल्या शाळा सोमवार, 23 नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहेत. पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग ऑनलाईन असतील, तर 9 ते 12 वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील शाळा मात्र 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. पुण्यात 13 डिसेंबर तर नाशिकमध्ये 4 जानेवारीपर्यंत शाळा बंद राहणार आहेत. पनवेल वगळता कोकणातील शाळाही उद्या सोमवारपासून सुरू होत आहेत. 

शाळा सुरू होण्याआधी शिक्षक, कर्मचार्‍यांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. या चाचणीदरम्यान अनेक जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. उस्मानाबादमधील 48 शिक्षक, नांदेडमध्ये एकाच शाळेतील अकरा शिक्षक, तर औरंगाबादमध्ये पंधरा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. बीड जिल्ह्यातील 25 शिक्षकही बाधित आढळले आहेत. अन्य जिल्ह्यांतही कमीअधिक प्रमाणात हीच स्थिती आहे. 

शाळा सुरू करण्याच्या या निर्णयाबाबत उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अनेक जिल्ह्यांतील शिक्षक कोरोनाबाधित झाले आहेत. असे असताना शाळा सुरू करण्याचा निर्णय कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. शिक्षक संघटनांनीही शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला आहे. सरकार जबाबदारी घ्यायला तयार नाही. पालकांनी आपल्या जबाबदारीवर मुलांना शाळेत पाठवावे, असे सरकार म्हणते. त्यामुळे या सरकारला शाळांची जबाबदारी घ्यायची नाही, अशी टीका शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी केली आहे.