Wed, Oct 28, 2020 10:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फडणवीसांची मुलाखत अनएडिटेड असेल : संजय राऊत

फडणवीस यांची मुलाखत अनएडिटेड असेल; राऊतांनी केले स्पष्ट

Last Updated: Sep 29 2020 3:16PM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या मुलाखतीसाठी फडणवीस आणि राऊतांची भेटी झाली असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर ही मुलाखत एडिटेड नसावी असा सूर अनेकांकडून व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर बोलताना राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत अनएडिटेड असेल असे स्पष्ट केले. तसेच, भविष्यात राहुल गांधी, अमित शाह यांचीही मुलाखत घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेते आहेत. राष्ट्रीय स्तरावरही त्यांचे नावलौकिक होत आहे. तरुण नेत्याला आपली मते मांडता येतील. देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत नक्कीच घेणार आहे असे सांगताना संजय राऊत यांनी सामनातील मुलाखत घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याचे स्पष्ट केले आहे. 

तसेच, जेव्हा दोन शास्त्रज्ञ भेटतात तेव्हा ते त्यांच्या क्षेत्रावर चर्चा करतात, डॉक्टर भेटतात तेव्हा ते वैद्यकीय क्षेत्रात काय सुरु आहे यावर चर्चा करतात. जेव्हा दोन राजकारणी भेटतात तेव्हा ते राजकीय विषयांवर बोलतात. आम्ही भेटत नाही असे वाटत असेल तर त्याला काही पर्याय नाही. पण असे भूकंप वैगेरै काही होत नाहीत, असे संजय राऊत यांनी फडणवीस भेटीवर बोलताना सांगितले.  यासोबत राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधत ''चंद्रकांत पाटील म्हणालेत पहाटे भूकंप होईल. आता त्यांनी गजर वैगेरे लावला असेल तर मला माहिती नाही,” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. पाच वर्ष काही काम नसल्याने आमच्या भेटीने भाजपा नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, असा खोचक टोमणाही राऊत यांनी भाजप नेत्यांना लगावला. 

 "