Mon, Apr 12, 2021 02:15
अँटेलिया स्फोटके प्रकरण अन् अनिल देशमुखांचा राजीनामा; आत्तापर्यंत काय घडलं...

Last Updated: Apr 05 2021 5:22PM

पुढारी ऑनलाईन डेस्क

मुकेश अंबानींच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ... त्यानंतर स्कोर्पिओचा मालक मनसुख हिरेन यांचा ठाण्याच्या खाडीत सापडलेला मृतदेह.. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यासंबंधी केलेले खळबळजनक आरोप... त्यानंतर सचिन वाझेंना झालेली अटक... मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची झालेले तडकाफडकी बदली... त्यावर परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटींच्या वसुलीचे केलेले आरोप, यासंदर्भात उच्च न्यायालयाने लावलेली सीबीआयची चौकशी आणि अनिल देशमुखांनी दिलेले गृहमंत्रीपदाचा राजीनामा, या सर्व मुद्द्यांवर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलेलं आहे. अंबानीच्या घराबाहेर सापाडलेल्या स्फोटकांपासून अनिल देशमुखांच्या राजीनाम्यापर्यंत नेमकं काय काय घडलं? ते थोडक्यात पाहू...

अंबानीच्या घरासमोरील स्फोटक प्रकरण 

२५ फेब्रुवारीला प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानींच्या अँटिलियासमोर २० जिलेटिनच्या कांड्या असलेली स्कोर्फिओ आढळून आली. त्यामध्ये अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकी देणारं पत्रही सापडलं. या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली. या प्रकराणाचा तपास करताना ती स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ ही मनसुख हिरेन यांची असल्याचं समोर आलं. त्यानंतर एका दहशतवादी संघटनेने या प्रकरणाची जबाबदारी घेतल्याचं वृत्तही समोर आलं. मात्र, विरोधी पक्षांनी या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याची मागणी केली. 

मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू

अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटके प्रकरणाचा तपास सुरू झाला. दरम्यान, स्कोर्पिओचे मालक मनसुख हिरेन बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले. दुसऱ्या दिवशी मनसुख यांचा मृतदेह मुंब्राच्या रेतीबंदर खाडीत सापडला. या नंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. एटीएसने हिरेन हत्येप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर मनसुख यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केला. मनसुख यांची हत्या झाल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. इकडे राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपही आक्रमक झाला आणि पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी ठाकरे सरकारवर विधीमंडळाच्या अधिवेशनातच हल्लाबोल केला. दरम्यान, केंद्र सरकाने हस्तक्षेप करत या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला. त्यानंतर राजकीय वातावरण आणखीनच तापले. 

स्फोटक प्रकरणात सचिन वाझेंचा प्रवेश

एनआयएने तपासाची चक्रे फिरवली. स्फोटकांनी भरलेली ती स्कोर्पिओ पोलिस अधिकारी सचिन वाझेंच्या ताब्यात होती, अशी धक्कादायक माहिती तपासातून पुढे आली. यानंतर वाझे यांच्याविरुद्ध भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत आरोपाच्या फैरी झाडल्या. अखेर १० मार्चला विधान परिषदेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंची बदली करण्याची घोषणा केली. वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली झाली. पण, त्याच दिवशी एनआयएने सचिन वाझेंना रात्री १२ च्या सुमारास अटक केली. 

परमबीर सिंगांची तडकाफडकी बदली

सचिन वाझेंना अटक झाल्यानंतर भाजपने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यामुळे राज्य सरकारने राज्याच्या पोलिस दलातच मोठे फेरूबदल केले. त्यामध्ये परमबीर सिंग यांची मुंबई पोलिस आयुक्त पदावरून तडकाफडकी बदली केली. त्यांच्या जागी पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती केली.

गृहमंत्री अनिल देशमुखांवरील भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

दरम्यान बदली झाल्याने परमबीर सिंग नाराज झाले. त्यांनी बदलीच्या दुस-याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले. या लेटर बॉम्बने पुन्हा एकदा राज्यातील राजकारण ढवळून तर निघालेच पण त्याचबरोबर स्फोटके प्रकरणाला आणखी एक वेगळं वळण लागलं. परबिर सिंग यांच्या या पत्रात देशमुखांकडून १०० कोटी वसूलीचे टार्गेट सचिन वाझेंना दिलेले होते, असा गंभीर आरोप करत परमबीर सिंगांनी माझ्यावर अन्याय झाला आहे, असं सांगत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 

न्यायालयाची भूमिका आणि परमबीर सिंग 

परमबीर सिंगांनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी याचिकेमध्ये केलेली होती. मात्र, या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करण्यास स्पष्ट नकार देत ही याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर परमबीर सिंगांनी आपला मोर्चा उच्च न्यायालयाकडे वळविला. मात्र, उच्च न्यायालयाने काही महत्वाचे मुद्दे उपस्थित करून परमबीर सिंगांना खडसावलं होतं. आज यावर उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. परमबीर सिंगांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची सीबीआयने चौकशी करून १५ दिवसांमध्ये अहवाल सादर करावा, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. 

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

अनिल देशमुखांवर सीबीआय चौकशी लागल्यामुळे विरोध पक्षांनी देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. त्यानंतर शरद पवार, अजित पवार आणि अनिल देशमुख यांची तातडीची बैठक झाली. त्यामध्ये गृहमंत्री पद सोडण्याची तयारी देशमुखांनी दर्शवली. बैठकीनंतर अनिल देशमुखांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सोपविला. राजीनाम्याची पत्र ट्विटरवर शेअर करून गृहमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याची माहिती दिली.

रेणू शर्मा आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचं प्रकरण, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण आणि वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा आणि आता अंबानी स्फोटक प्रकरण, सचिन वाझेंची अटक आणि त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा या सर्व महत्वाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीची प्रतिमा ही डागाळलेली आहे, असा आरोप विरोधी पक्षाकडून होतं आहे.