मुंबई : पुढारी ऑनलाईन
विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये सहभागी झालेल्या चित्रा वाघ यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बोचरी टीका केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर नवा वसुलीमंत्री कोण, असे विचारत वाघ यांनी ट्विट केले होते. ज्यांच्या नवऱ्यावर भ्रष्टाचाराची रीतसर तक्रार दाखल आहे, त्यांनी वसुलीमंत्री कोण विचारणे, हास्यास्पद असल्याचे म्हणत चाकणकर यांनी चांगलाच समाचार घेतला. राष्ट्रवादीत कधीकाळी एकमेकीसोबत असलेल्या दोन महिला नेत्यांत रंगलेला कलगीतुरा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
वाचा : माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग एनआयएच्या कार्यालयात दाखल
१०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपानंतर हायकोर्टाने या प्रकरणी तपास करण्याचे निर्देश सीबीआयला दिले. त्यानंतर अनिल देशमुख यांनी तत्काळ राजीनामा दिला. त्यानंतर भाजपने नवा वसुलीमंत्री कोण? असा प्रश्न विचारणारी सोशल मीडियावर मोहीम राबविली. त्याचाच एक भाग म्हणून चित्रा वाघ यांनी ‘आता नवा वसुलीमंत्री कोण’ असा प्रश्न विचारत बोचरी टीका केली होती. महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचारी असून नवा वसुलीमंत्री कोण असेल असा सवाल त्यांनी ट्विटमध्ये केला होता.
रुपाली चाकणकर यांनी फेसबुक पेजवर पोस्ट करून वाघ यांचा समाचार घेतला होता. ‘ताईंचा नवरा स्वतः भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल आहे आणि ताई विचारत आहेत ‘नवीन वसुली मंत्री कोण?’ अहो ताई, भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की अंगलट आलं की परत ‘पवार साहेब माझ्या वडिलांसारखेच आहेत’ हे म्हणायची वेळ येईल. थोडा धीरज रखो, सब सच सामने आयेगा.’ अशी पोस्ट टाकून स्क्रीन शॉटही टाकला आहे.
वाचा : आमदार प्रताप सरनाईक यांच्या बिल्डर मित्राला अटक; ईडीची कारवाई
त्यानंतर काही अवधीमध्येच दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रिपदाची सूत्रे घेतल्यानंतर वाघ यांनी वळसे पाटील यांच्यासोबतचा फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या. ‘दिलीप वळसे-पाटील साहेब राज्याचे नवीन गृहमंत्री.. महाराष्ट्रात महिला, मुलींवर होणाऱ्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी कठोर पावले उचलत घटनांची तत्काळ दखल घ्याल या अपेक्षांसह मन:पूर्वक शुभेच्छा’ असे ट्विट करत शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यावरही चाकणकर यांनी टोला लागवला.
वाचा : मुंबईत कोरोना पसरवतोय तरी कोण?
‘राजकीय उदरनिर्वाहासाठी बेताल वक्तव्य करणाऱ्या काही लोकांना नवीन वसुलीमंत्री कोण याची काळजी लागली होती. एकीकडे ‘मी पवार साहेबांच्या तालमीत वाढले, ते माझे बाप आहेत’ म्हणायचं आणि दुसरीकडे असं अशोभनीय वक्तव्य करायचा दुटप्पीपणा कसा जमत असेल? कर्तव्यनिष्ठता ही दिलीपराव वळसे -पाटील यांची ओळख आहे. कारवाई होऊ नये म्हणून पक्ष बदलणाऱ्या लाचखोरांनी जरी त्यांना शुभेच्छा दिल्या असल्या तरी ते अशा गुन्हेगारांना सोडणार नाहीत. गृहमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल साहेबांचे मन:पूर्वक अभिनंदन.’ अशी फेसबुक पोस्ट करत चाकणकर यांनी वाघ यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.