Thu, Nov 26, 2020 21:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रारूप मतदारयाद्यांची 1 डिसेंबरला प्रसिद्धी

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रारूप मतदारयाद्यांची 1 डिसेंबरला प्रसिद्धी

Last Updated: Nov 22 2020 2:04AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्यभरातील 14 हजार 233 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 1 डिसेंबर रोजी प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यावर 7 डिसेंबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 10 डिसेंबर रोजी अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्‍त यू. पी. एस. मदान यांनी शनिवारी दिली आहे. 

मदान म्हणाले, एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या, नवनिर्मित 1 हजार 566 तसेच जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणार्‍या तसेच नवनिर्मित 12 हजार 667 अशा एकूण 14 हजार 233 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी या मतदारयाद्या तयार केल्या जातील. 

यातील एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. परंतु, कोरोनाची परिस्थिती उद्भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता, तर 19 नोव्हेंबर 2020 रोजी ही संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच रद्द करण्यात आली. या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2020 पर्यंत अद्ययावत केलेल्या विधानसभेच्या मतदारयाद्यांवरून ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदारयाद्या तयार करण्यात आलेल्या होत्या. विधानसभेच्या या मतदारयाद्या 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित होत्या. परंतु, केंद्रीय निवडणूक आयोगाने आता 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित अद्ययावत मतदारयाद्या 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केल्या आहेत. मतदारयाद्यांत नाव नोंदविलेल्या सर्वांना मतदान करता यावे किंवा निवडणूक लढविता यावी, हे लोकशाहीचे मूलभूत तत्त्व आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमासह 5 फेब्रुवारी 2020 च्या आदेशान्वये तयार केलेल्या मतदारयाद्यादेखील रद्द केल्या होत्या. आता निवडणूक प्रक्रिया रद्द झालेल्या ग्रामपंचायतींसह एकूण 14 हजार 233 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदारयाद्यांचा हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.