मुंबई : पुढारी वृत्तसेवा
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील उपलब्ध बेड्सची दिलेली आकडेवारी राज्यातील एकूण कोरोना रुग्ण संख्येच्या 10 टक्केही नाही, ती फसवी आकडेवारी आहे, असा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला असताना कोरोना रोखण्यात महाविकास आघाडीचे सरकार पूर्णपणे भांबावले असून प्रत्यक्ष भूमिका न घेता जनसंपर्क कार्यालयासारखे काम करीत आहे, असे सांगून दरेकर म्हणाले, मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर यासह अनेक शहरात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असून बेड्स, व्हेंटिलेटर, रेमडिसीवीर इंजेक्शन, आयसीयू बेडची कमतरता भासत आहे.
दरेकर म्हणाले, रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. त्यावर सरकारचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही आणि त्यामुळे गरजू रुग्णांना हे इंजेक्शन उपलब्ध होत नाही. राज्यात संपूर्णपणे आरोग्य व्यवस्थेचा बट्याबोळ झाला असून त्याचं खापर केंद्रावर टाकून आपल्याला मोकळे होता येईल, या भ्रमात हे सरकार दुर्दैवाने आहे, असेही दरेकर यांनी ठणकावले.
ऑक्सिजनचा पुरवठा इतर राज्यातून व्हावा, लसी, रेमडिसीवीर, व्हेंटिलेटर या गोष्टीही केंद्राने द्याव्या, अशी आरोग्यमंत्र्यांची अपेक्षा आहे. लसी, व्हेंटिलेटर, औषधे, मास्क, अन्नधान्य, गरिबांना आणि शेतकर्यांना थेट रक्कम, अशी सर्व मदत केंद्र सरकारनेच केली. सर्वच गोष्टी केंद्राकडून मागत असताना राज्य सरकारचीही काही जबाबदारी आहे की नाही? आता सरकारने केवळ बोलण्यापेक्षा कृती करावी आणि जे काही केले असेल ते जनतेला सांगावे, असे दरेकर म्हणाले.
विशिष्ट धर्मियांवर मेहेरनजर
रमजान पर्वात विशेष परवानगी देण्यासाठी मुस्लीम शिष्टमंडळ भेटल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. रमजानची आस्थेवाईक दखल राजेश टोपे यांनी घेतली, पण आज हिंदू धर्मियांची देवळे बंद आहेत, पुजारी, मंदिरांबाहेरील छोटे व्यावसायिक यांची उपासमार होत आहे. परंतु, या सरकारकडून विशिष्ट धर्मियांना गोंजारण्याचे काम केले जात आहे, अशी टीका दरेकर यांनी केली.