Sun, Sep 20, 2020 10:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईतून उडू लागली विमाने!

मुंबईतून उडू लागली विमाने!

Last Updated: May 26 2020 1:25AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

गेल्या 24 मार्चपासून दोन महिने कोरोनामुळे बंद असलेल्या देशांतर्गत विमानांनी सोमवारपासून पुन्हा आकाशात भरारी घेण्यास सुरुवात केली. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दिवसभरात 47 विमानांचे आगमन-उड्डाण झाले. प्रवाशांमध्ये मुंबईत येणार्‍यांपेक्षा मुंबई बाहेर जाणार्‍यांचीच संख्या अधिक होती. दिवसभरात एकूण 4,852 प्रवाशांपैकी 3 हजार 752 प्रवासी मुंबईबाहेर गेले तर 1,100 प्रवासी मुंबईत उतरले.

देशभरातील विविध विमानतळावरुन सोमवारी 532 विमाने संचालित झाली,यामधून 39,231 प्रवाशांनी प्रवास केला. आंध्रप्रदेशची विमानतळे मंगळवार तर पश्चिम बंगालमध्ये 28 मेपासून सुरु होणार आहे. कोरोनाचा प्रादुभाव रोखण्यासाठी आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी विमानतळावर सुरक्षेचे सर्व उपाय करण्यात आले होते.प्रवासासाठी घालण्यात आलेल्या अटींनुसार विमानतळावर आलेल्या प्रवाशांनी मास्क, हातमोजे घातले होते. प्रवाशांना आरोग्य सेतू अ‍ॅप अनिवार्य करण्यात आला होता. त्याचीही तपासणी केली जात होती.

विमानतळावर उतरणार्‍या प्रवाशांना एका अर्जावर स्वत:ची संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक होते. प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंगद्वारे तपासणीही, सॅनिटायझरची फवारणीचा वापरही के ला जात होता. विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांची तपासणी के ल्यानंतर त्यांच्या डाव्या हातावर सात दिवस घरातच राहण्याचा विलगीकरणाचा शिक्का मारला जात होता. या सर्व प्रकिया पूर्ण करुन विमानतळाबाहेर पडण्यासाठीही एक ते दीड तास लागत होता.

 "