Sat, Aug 08, 2020 12:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रुग्णांना कठड्यावर, पॅसेजमध्ये ऑक्सिजन लावले

रुग्णांना कठड्यावर, पॅसेजमध्ये ऑक्सिजन लावले

Last Updated: Jul 06 2020 1:18AM
डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातील बेड हाऊसफुल झाल्याचे सांगत रुग्णालयाच्या  प्रवेशद्वारावरील कठड्यावर आणि पॅसेजमध्येच  बसवून रुग्णांना ऑक्सिजन  लावले जात असल्याचे धक्कादायक वास्तव  कल्याण-डोंबिवली  महापालीकेच्या  शास्त्रीनगर  रुग्णलयात  समोर  आले  आहे. शनिवारी याच शास्त्रीनगर रुग्णालयाच्या  आवारात कोरोना  स्वॅब  टेस्टिंगसाठी   रुग्णांनी   भर  पावसात  रांग  लावत  एकच  गर्दी  करून  सोशल  डीस्टसिंगला  हरताळ  फासल्याचा  व्हिडीओ  समोर  आला  होता. 

कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून आरोग्य सुविधासह वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर बेडची सुविधा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे.  मात्र  कोरोना रुग्णाची संख्या आठ हजाराच्या पुढे तर उपचार घेणार्‍यांची संख्या पाच हजाराच्या पुढे आहे. 

शास्त्रीनगर रुग्णालयात 57 बेडचे  कोविड सेंटर आहे. तेही  रुग्णांनी फुल्‍ल झाले आहे. श्‍वास घेण्यास त्रास होणारे रुग्ण काही वेळच्या फरकाने रुग्णालयात दाखल होतात.  या रुग्णांचा  जीव वाचविण्यासाठी  रुग्णालयात जिथे जागा मिळेल  तिथे  रुग्णांना बसवून त्यांना ऑक्सिजन लावले जात आहेत. अगदी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील आणि पॅसेजमधील कठड्यावर बसवून ऑक्सिजन लावण्यात येत असल्याचे समोर आले आहे.  ही परिस्थिती धोकादायक असून, यात सरकारने लक्ष घालावे, अशी मागणी रुग्णांकडून केली जात आहे.