Mon, Sep 28, 2020 06:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पार्थ - अजित पवार अजून मौनातच!

पार्थ - अजित पवार अजून मौनातच!

Last Updated: Aug 15 2020 12:58AM
मुंबई : उदय तानपाठक

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी करून पक्षविरोधी भूमिका घेणारे पार्थ पवार अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत; तर  अजित पवार यांनी अजून या प्रकरणावर मौन बाळगल्याने पवार कुटुंबातील हा गृहकलह आता कोणते वळण घेणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. 

अजित पवार आणि पार्थ शनिवारी काटेवाडी या आपल्या मूळ गावी जाणार असून त्यांच्या कुटुंबीयांची तेथे बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले. याच बैठकीत अजित पवारांचे कुटुंबीय चर्चा करून पुढील भूमिका ठरवण्याची शक्यता आहे. पवार कुटुंबातील सुप्रिया आणि अजित या चुलत भाऊ-बहिणीमध्ये सत्तासंघर्ष सुरू आहे. अजित पवार हे त्यावरूनच गेले अनेक महिने अस्वस्थ आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतल्यानंतर तर त्यांची अस्वस्थता वाढली आहे. 

शरद पवारांचे पार्थबद्दलचे विधान त्यांच्या राजकीय वाटचालीत मोठाच अडथळा होऊ शकते, असे अजित पवारांच्या कुटुंबीयांचे मत आहे. त्यामुळेच आता अजित पवारांचे भाऊ श्रीनिवास आणि अभिजित व त्यांचे कुटुंबीय शनिवारी काटेवाडीत एकत्र येऊन चर्चा करणार आहेत. 

फडणवीसांचे विश्‍वासू पवारांच्या दालनात

दरम्यान, कॅबिनेटची बैठक सुरू असताना अजित पवार बाहेर पडले आणि तडक आपल्या दालनात गेले. तेथे त्यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी होती. मात्र, उपमुख्यमंत्री केवळ मराठा आरक्षण समर्थक विनोद पाटील, दिवंगत आर. आर. पाटील यांचे तत्कालीन खासगी सचिव गणेश जगताप यांच्याशी त्यांनी चर्चा केली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा विश्‍वासू आमदार प्रशांत बंब हे उपस्थित होते, असे समजते.
 

 "