Sun, Aug 09, 2020 14:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानकडून नवी खेळी?

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानकडून नवी खेळी?

Last Updated: Jul 08 2020 4:49PM
इस्लामाबाद : पुढारी ऑनलाईन

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी कैदेत असलेल्या भारतीय नौदलाचे सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिला आहे. जाधव यांना आणखी एक कौन्सिलर ॲक्सेस देण्याचा प्रस्ताव दिल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. 

जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिल्याचे माहिती आहे. या प्रकरणात अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे. पाकिस्तानने जाधव यांना १७ जून रोजी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास सांगितले, पण जाधव यांनी नकार दिला. यासंदर्भात पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्तांना पत्र लिहिले आहे.

जाधव यांना हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली एप्रिल २०१७ मध्ये पाकिस्तानी लष्करी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. नंतर, जाधव यांना कौन्सिलर ॲक्सेस देण्यास पाकिस्तानने नकार दिल्याने भारताने शिक्षेला आव्हान देत पाकिस्तानविरूद्ध इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीसमध्ये दाद मागितली होती. तेथे  भारताच्या बाजूने निकाल आला होता. आयसीजेने पाकिस्तानला जाधव यांच्या शिक्षेचा आढावा घेण्यास व लवकरात लवकर त्यांना कौन्सिलर ॲक्सेस देण्याचे आदेश दिले. तेव्हापासून हा आदेश लागू करण्याच्या प्रयत्नात भारत पाकिस्तानशी संपर्कात आहे.

याप्रकरणी भारताचा अर्ज स्वीकारताना पाकिस्तानच्या आक्षेपास नकार दिला होता.  आयसीजेने आपल्या ४२ पानांच्या आदेशानुसार फाशीच्या शिक्षेवरील स्थगिती कायम ठेवल्याने जाधव यांच्या शिक्षेचा आढावा घेण्याची अटळ परिस्थिती निर्माण झाली आहे. जाधव यांना दिलेल्या शिक्षेमुळे दोन्ही शेजारच्या देशांत तणाव निर्माण झाला आहे. तथापि, आयसीजेने लष्करी कोर्टाचा निर्णय रद्द करणे आणि त्यांची सुटका यासह भारताच्या अनेक मागण्या नाकारल्या आहेत.