Thu, Nov 26, 2020 20:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दहावी, बारावी परीक्षेचा आता पॅटर्न बदला

दहावी, बारावी परीक्षेचा आता पॅटर्न बदला

Last Updated: Nov 23 2020 1:43AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाय करावेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी दहावी, बारावी परीक्षांचा पॅटर्नही बदलून त्याचा निर्णयही लवकर व्हावा, अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच शाळा महाविद्यालये सुरू करण्याची घाई करू नये, अशी मागणीही या पत्रात केली आहे.

शाळा सुरू करण्यापूर्वी करण्यात आलेल्या शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचणीमध्ये राज्यातील 500 हून अधिक शिक्षक कोविड पॉझिटिव्ह निघाले आहेत. ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती पाहता मुंबईप्रमाणे महाराष्ट्रातील कोविड संसर्गाची शक्यता असलेल्या सर्व भागातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवणे उचित ठरेल, असे पाटील यांनी म्हटले आहे. 

व्हॅक्सिन येत नाही तोवर शाळा, महाविद्यालये सुरू करण्याची घाई करू नये. तसेच व्हॅक्सिन आल्यानंतर आरोग्य आणि पोलीस कर्मचारी यांच्या सोबतच विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर आणि अंगणवाडी सेविकांना प्राधान्याने व्हॅक्सिन मोफत उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.