Wed, Jun 23, 2021 01:46
ही तर शरद पवारांची काँग्रेसला धमकी

Last Updated: Jun 11 2021 9:11PM

मुंबई: पुढारी ऑनलाईन 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनात शरद पवार यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र लढविण्याचे केलेले वक्तव्य आता राजकीय वर्तुळात गाजत आहे. पवार जे बोलतात त्याचा नेमका उलटा अर्थ घ्यायचा असतो, असे म्हणत भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांनी ‘ही तर काँग्रेसला उघड धमकी आहे,’ असे म्हणत पवारांच्या वक्तव्याचा अर्थ लावला आहे.

 वाचा : चेल्लम सरांनी दिली मुंबई पोलिसांना टीप

राणे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात, तेव्हा त्याचा उलटअर्थी अर्थ लावायचा असतो. ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे.’ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या दिवशी बोलताना महाविकासआघाडी सरकारचे भवितव्य आणि  आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीविषयी वक्तव्य केले होते. ‘हे सरकार पाच वर्षे टिकेल नुसतेच काम करणार नाही तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित काम करुन सामान्य जनतेचे देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचे काम करेल याबाबत शंका नाही’, असे पवार यांनी वक्तव्य केले होते. यावर आता भाजपच्या गोटातून आता प्रतिक्रिया येत आहेत. 

वाचा : उदयनराजे म्हणाले, ‘संभाजीराजे माझे बंधू कधीही भेटू शकतात’

राणे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत निवडणूक लढवणार असं म्हणाले आहेत. जरी शरद पवार असं म्हणाले असले, तरी शरद पवार साहेब कधीही शिवसेनेसोबत निवडणूक लढवणार नाहीत’ दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणाले, ‘ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे. माननीय शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्याचा उलट अर्थी अर्थ लावायचा असतो.’

भाजपा आमदार राम कदम यांनी देखील टीका केली होती.‘ शरद पवार यांना शिवसेना हा वचन पळणारा मित्र आहे, असे म्हणावे लागले ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राजकीय हतबलता आहे. जो पक्ष बाळासाहेब ठाकरे यांचे वचन पाळू शकला नाही तो वचन पाळणारा पक्ष कोणत्या आधारावर आहे.’

वाचा : सुशीलकुमारच्या कोठडीत २५ जूनपर्यंत वाढ