Tue, Sep 29, 2020 19:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मॉस्कोनंतर आता मुंबईच जगातील मोठा हॉटस्पॉट!

मॉस्कोनंतर आता मुंबईच जगातील मोठा हॉटस्पॉट!

Last Updated: May 27 2020 1:37AM
मॉस्को/मुंबई : पुढारी वृत्तसेवा/वृत्तसंस्था

राज्यात मंगळवारी कोरोनाचे 2091 नवे रुग्ण आढळले आणि मुंबईतही 1002 कोरोना रुग्णांची भर पडली. मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा वाढता वेग कायमच असल्याचे यावरून दिसते.  दरम्यान, मुंबईत दर शंभर चाचण्यांमागे तब्बल 32 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. रशियाची राजधानी मॉस्कोनंतर सध्या सर्वाधिक नवे रुग्ण मुंबईतच आढळत आहेत. मुंबई हा सध्या मॉस्कोपाठोपाठ जगातील एक मोठा कोरोना हॉटस्पॉट बनला आहे. 

मुंबईत गेल्या 24 तासात 39 जणांचा मृत्यू झाला असून 410 जण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत मृत्युमुखी  पडलेल्या 39 जणांपैकी 25 जणांना दीर्घकालीन आजार होते. मुंबईत आतापर्यंत 8814 रुग्ण बरे झाले. तर 1,065 जणांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या 36 हजार 4 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मंगळवारी 1168 रुग्ण बरे होवून घरी गेले असून आतापर्यंत 16 हजार 954 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आत्तापर्यंतच्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या ही 54 हजार 758 एवढी आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात 5 लाख 67 हजार 622 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 35 हजार 200 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

13 मेपासून ते 23 मेपर्यंत मुंबईत 43 हजार 25 जणांच्या चाचण्या झाल्या. यात 13 हजार 853 लोक संक्रमित आढळले. मुंबईत 14 हजार नवे रुग्ण केवळ 10 दिवसांत आढळले आहेत. रशियाची राजधानी मॉस्कोनंतर मुंबईतच दररोज इतके रुग्ण आढळत आहेत. 22 मे रोजी मुंबईत 1,751 रुग्ण आढळले. या तारखेला मॉस्कोत 2,988 नवे संक्रमित आढळले होते. 

मे महिन्यात मुंबईत रुग्ण संख्या तीन पट झाल्याची दखल आता जागतिक स्तरावर घेतली गेली आहे. मे च्या मध्यात न्यू यॉर्कपेक्षाही मुंबईने अधिक रुग्ण संख्या अनुभवली. ज्या न्यू यॉर्कने कोरोना साथीची पहिली लाट अनुभवली तिथे तुलनेेने कोरोनाचा जोर मात्र मंदावतो आहे. 6 एप्रिल रोजी न्यू यॉर्कने एकाच दिवसात 6504 रुग्ण नोंदवले होते. 22 मेच्या मुंबईच्या नव्या रुग्णसंख्येपेक्षा ही संख्या अर्थात तीन पट होती आणि या टोकाच्या आसपासदेखील अद्याप मुंबई पोहोचलेली नाही. मात्र न्यू यॉर्कची लोकसंख्या मुंबईच्या तीन चतुर्थांश आहेे. अन्य दोन कोरोना हॉटस्पॉट असलेली मोठी शहरे रशियाची राजधानी मॉस्को आणि ब्राझीलमधील साव पावलो ही दोन शहरे मात्र मुंबईसारखीच लोकसंख्या असलेली आहेत. 22 मे रोजी मुंबईने 1751 नवे रुग्ण नोंदवले. मॉस्को वगळता जगातील कोणत्याही शहरात त्या दिवशी इतके नवे रुग्ण आले नव्हते. त्यातही साव पावलोतील 7 दिवसांच्या सरासरी नव्या रुग्णांपेक्षा मुंबईतील ही संख्या जास्त होती. आता मॉस्कोतही दिवसाला येणार्‍या नव्या रुग्णांचे प्रमाण घटते आहे आणि मुंबईत मात्र ते वाढते आहे. गेल्या आठवड्यापासून मुंबईत प्रचंड संख्येने नवे रुग्ण दाखल होत असून, मुंबईने या बाबतीत मॉस्को आणि साव पावलो या दोन्ही महानगरांना मागे टाकले आहे.

अर्थात मॉस्को आणि साव पावलोचा मृत्यूदर हा मुंबईपेक्षा किती तरी पट भयंकर आहे. 24 मे पर्यंत मुंबईने 988 कोरोना बळी नोंदवले. साव पावलोत हीच संख्या 3352 तर मॉस्कोमध्ये 1867 आहे. गेल्या आठ दिवसांत मुंबईने 254 मृत्यू नोंदवले. हेच प्रमाण मॉस्कोत 509 आणि साव पावलोत 678 राहिले. कोरोनाचा हा प्रवाह लक्षात घेतला तर मॉस्को आणि साव पावलो या दोन्ही हॉटस्पॉटना मागे ?टाकून मुंबईतील कोरोना विषाणूची साथ फार वेगाने पुढे निघाली आहे.  

 "