Fri, Oct 02, 2020 00:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई, ठाण्यात कोरोनाची पिछेहाट

मुंबई, ठाण्यात कोरोनाची पिछेहाट

Last Updated: Aug 14 2020 1:46AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील मुंबई, पुणे आणि ठाणे यांसारखी महानगरे आता मागे पडली असून, कोल्हापूर, नागपूर, बीड यांसारख्या शहरांमध्ये कोरोनाचे नवे हॉटस्पॉट तयार होत असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई, ठाणे, पुणे अशा एकूण 8 जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णवाढीचा दर हा राज्यातील सरासरी रुग्णवाढीच्या दराहून कमी आहे. याउलट कोल्हापूर, नागपूर बीड, उस्मानाबाद अशा तब्बल 27 जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचा दर राज्याच्या सरासरी दराहून अधिक असल्याची चिंताजनक बाब एका अहवालात समोर  आली आहे.

राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर 4 ते 11 ऑगस्टदरम्यान प्रतिदिन 2.2 टक्के इतका होता. या कालावधीत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे या जिल्ह्यांत त्याहून कमी टक्क्याने रुग्णवाढ झाली आहे. त्यात मुंबईतील रुग्णवाढीचा दर 0.7 टक्के आणि ठाण्यातील रुग्णवाढीचा दर 1.1 टक्के इतका होता. याउलट कोल्हापूर, नागपूर, बीड, उस्मानाबाद, अहमदनगर, परभणी या जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचा दर सरासरी दुप्पट ते तिप्पट होता. त्यामुळे या जिल्ह्यांमधील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त होत आहे. गेल्या आठवड्यापासून दुष्काळग्रस्त मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांमध्ये झपाट्याने कोरोनाचे नवे रुग्ण सापडत आहेत. याच धर्तीवर बीड आणि परभणी जिल्हा प्रशासनाने 12 ऑगस्टपासून 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात एकमेव बीड जिल्ह्यामध्ये गेल्या सहा आठवड्यांत सातत्याने कोरोना रुग्णांत वाढ नोंदविण्यात आली आहे. बीड जिल्ह्यामध्ये 30 जून ते 7 जुलैदरम्यान असलेला 3.9 टक्के कोरोना रुग्णवाढीचा दर आजघडीला 9.2 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
गेल्या आठवड्यात येथील रुग्णसंख्या 989 वरून 1 हजार 828 पर्यंत म्हणजेच दुपटीने वाढली आहे. राज्य शासनातील एका अधिकार्‍याने सांगितले की, बहुतेक जिल्ह्यांमध्ये आरोग्य कर्मचार्‍यांची मोठी कमतरता भासत आहे. प्रशासनासमोर सध्या एक मोठी अडचण आहे.

राज्यातील कोरोना रुग्णवाढीमध्ये दुसरा क्रमांक उस्मानाबाद जिल्ह्याचा आहे. या ठिकाणी सरासरी 7 टक्के सरासरीने रुग्ण वाढत आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांत 28 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय 4 ते 11 ऑगस्ट या कालावधीत उस्मानाबादमध्ये नव्या एक हजार रुग्णांची नोंद झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळपर्यंत 12,500 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या आठवड्यात कोल्हापूर, नागपूर, बीड या जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचा दर पाच ते सहा टक्के होता. राज्यातील सरासरी रुग्णवाढीच्या दराहून अहमदनगर जिल्ह्यामध्ये तिपटीने रुग्ण वाढत आहेत. परिणामी, नगर जिल्ह्यात सध्या 3 हजार 900 सक्रिय रुग्ण असून, एकूण रुग्णसंख्या 11 हजारांवर पोहोचली आहे. कोरोना निर्मूलनाचे जिल्हाप्रमुख डॉ. बापूसाहेब गाडे यांनी सांगितले की, याआधी संगमनेर हॉटस्पॉट होता. मात्र, आता शिर्डीतील काही तालुक्यांमध्ये व शहरांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तूर्तास शिर्डीमध्ये 100 ते 115 रुग्ण आहेत. दहा दिवसांपूर्वी जिल्ह्यामध्ये तब्बल 747 रुग्ण एकाच दिवशी आढळले होते. त्यानंतर दररोज 300 ते 500 नव्या रुग्णांची भर पडत आहे. सध्या तरी 150 अत्यवस्थ रुग्ण असून, त्यांच्यासाठी आवश्यक आयसीयू व्यवस्था प्रशासनाकडे उपलब्ध असल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 कोल्हापूर, सोलापुरात काळजी घेण्याची गरज : डॉ. प्रदीप आवटे

राज्य नियंत्रण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणालेकी, मराठवाड्यामध्ये लोकसंख्येचे प्रमाण कमी असल्याने रुग्णवाढीचा दर अधिक दिसत आहे. त्यामुळे मुंबई व पुण्यासारख्या महानगरांप्रमाणे या ठिकाणी झपाट्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही. दरम्यान, कोल्हापूर, सोलापूर आणि जळगाव या ठिकाणी काळजी घेण्याची गरजही डॉ. आवटे यांनी व्यक्त केली.

 "