Tue, Sep 29, 2020 19:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईची आर्थिक चक्रे फिरणार

मुंबईची आर्थिक चक्रे फिरणार

Last Updated: Aug 04 2020 1:19AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई महानगरपालिकेने लॉकडाऊनमध्ये अजून शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सम व विषम तारखेला उघडणारी मुंबईतील दुकान आता दररोज खुली करण्यास परवानगी दिली आहे. याची अंमलबजावणी बुधवार 5 ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईत अजूनच गर्दी उसळणार असून कोरोना रुग्ण वाढीचा कमी झालेल्या दर वाढण्याची भीती व्यक्त केली. 

मुंबईचा आजूबाजूच्या शहरात अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशात मुंबई महानगरपालिकेने लॉकडाऊनमध्ये शिथीलत आणण्यास सुरुवात केली आहे. सध्या मुंबईतील दुकानदारांना सम व विषम तारखेत दुकान खुली ठेवण्याचे बंधनकारक आहे. तरीही संपूर्ण मुंबई नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. पण आता सम-विषम तारखेचा फॉर्मूला रद्द करण्यात येणार असल्यामुळे दुकानात व आजूबाजूच्या परिसरात होणारी गर्दी रोखणे पालिकेला शक्य होणार नसल्याचे बोलले जात आहे. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सोमवारी परिपत्रक काढून दररोज दुकानात सुरू करण्यात परवानगी दिली आहे. याची अंमलबजावणी बुधवार 5 ऑगस्टपासून होईल.

मुंबईत आपल्या व्यवसायानिमित्त येणारे व्यापारी हे भाईंदरसह मुलुंड आदी भागात राहतात. यातील बहुतांश व्यापारी आपली वाहने घेऊन येत असल्यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गासह दक्षिण मुंबईतील अन्य मार्गावर वाहतूककोंडी होत आहे. मिरा रोड भाईंदरला राहणारे बहुतांश व्यापारी लोकल ट्रेनने मरीन लाईन्सला उतरून पुढे आपल्या दुकानात जातात. मात्र लोकल बंद असल्यामुळे या व्यापार्‍यांना आपली गाडी घेऊनच दुकानात जावे लागणार आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूककोंडी अजूनच वाढणार आहे. क्रॉफर्ड मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात सजावटीचे सामान मिळत असल्यामुळे येथे गणेशोत्सवानिमित्त मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. मुंबईत परवानाधारक 1 लाख 460 दुकान असून यात नऊपर्यंत कामगार संख्या असणार्‍या दुकानांची संख्या 86 हजार 22 दहापेक्षा जास्त कामगार असलेल्या दुकानांची संख्या 14 हजार 438 इतकी आहे. व्यवसायिक आस्थापनाची संख्या 1 लाख 50 हजार इतकी आहे.

1 या परवानगीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या दुकानदारांना मोठा दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया फेडरेशन ऑफ रीटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने व्यक्त केली आहे. गेल्या चार महिन्यांपासून आर्थिक संकटात असलेल्या दुकानदारांची आर्थिक कोंडी या निर्णयामुळे काही प्रमाणात कमी होईल, असा विश्वासही संघटनेचे अध्यक्ष विरेन शहा यांनी व्यक्त केला आहे.

2 मुंबईतील दारूच्या दुकानांना आता काऊंटरवर दारू विकण्यास आणि घरपोच देण्यास परवानगी आहे. मात्र, आता मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे नियम कठोर करण्यात आले आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसेल तर, मालकांविरोधात ‘एफआयआर’ दाखल करण्यात येणार आहे. 

3मल्टिप्लेक्स सिनेमागृह असलेले मॉल्स वगळता, अन्य शॉपिंग मॉल 5 ऑगस्टपासून सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुले राहणार आहे. जिमखाण्यातील आउटडोर खेळांनाही परवानगी देण्यात आली आहे.दुचाकीवर दोघांना प्रवास करण्याची मुभा दिली आहे. चारचाकी वाहनांमध्ये चालक व तीन प्रवासी, रिक्षामध्ये चालकासह दोन जण प्रवास करण्याची मुभा राहणार आहे.

ठळक वैशिष्ट्ये

 मॉल्समधील चित्रपटगृहे, उपहारगृहे आणि लहान खाद्य पदार्थ पुरवणारी दुकाने बंद राहणार आहेत. मात्र, त्यांना फक्त घरपोच खाद्य सेवा द्यायला परवानगी देण्यात आली आहे. स्विमिंग पूल बंद राहणार आहेत. टॅक्सी, कॅबमध्ये वाहनचालक आणि तीन व्यक्ती, रिक्षामध्ये वाहनचालक आणि दोन व्यक्ती, चारचाकी वाहनांमध्ये वाहनचालक आणि तीन व्यक्ती, दुचाकीमध्ये हेल्मेटसह दोघांना परवानगी देण्यात आली आहे.
 

 "