Sat, Aug 08, 2020 14:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सतत रडणार्‍या बाळाची निर्दयी मातेने केली हत्या

सतत रडणार्‍या बाळाची निर्दयी मातेने केली हत्या

Published On: Aug 13 2018 1:21AM | Last Updated: Aug 13 2018 12:54AMभिवंडी : वार्ताहर

सतत रडून त्रास देत असल्याने एका निर्दयी मातेनेच सहा महिन्यांच्या पोटच्या बाळाला नाल्यात बुडवून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना भिवंडीतील कवाड येथे घडली आहे. या प्रकरणी निर्दयी माता कल्पना गायकर (25) हिला भिवंडी तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे. तर वृषभ (6 महिने) असे हत्या करण्यात आलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. विशेष म्हणजे आरोपी कल्पनाचा नवरा निलेश हा धन, पैसा मिळेल या लालसेने तंत्रमंत्र, बुवाबाजीच्या आहारी गेल्याची माहिती समोर आली असून हा प्रकार नरबळीचाही असावा, असा कयास गावकर्‍यांकडून लावला जात आहे.

कल्पना ही पती व दोन मुलांसह तालुक्यातील कोळीवली (धापसीपाडा) येथे राहत असून चिमुकल्या वृषभचा मृतदेह 8 ऑगस्ट 2018 रोजी सायंकाळच्या सुमाराला तालुक्यातील कासपाडानजीकच्या रस्त्यालगत असलेल्या नाल्यात आढळून आला होता. वृषभ सर्दी, खोकला व तापाने आजारी असल्याने त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्याऐवजी तंत्र-मंत्राने इलाज सुरू होते. त्यामुळे त्याची प्रकृती खूपच गंभीर झाली होती. तो सतत जोरजोराने रडत होता. त्याच्या रडण्याने त्रस्त झालेल्या कल्पनाने कवाड (नित्यानंद नगर) येथील माहेर गाठले व बाळाला ओहळाच्या पाण्यात नेऊन बुडवले. त्यानंतर तिने आई-वडिलांकडे येऊन मुलाला कोणीतरी बुडवल्याचे सांगून दुष्कृत्य लपवण्याचा प्रयत्न केला.या हत्येप्रकरणी शनिवारी आरोपी कल्पनाला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची (सोमवारपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव पाटील करीत आहे. 

शिवविच्छेदन अहवालाने फुटले बिंग

शेजार्‍यांनी कल्पनावर संशय व्यक्त करून या प्रकाराची माहिती तालुका पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुका पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच चिमुकल्याचा मृतदेह नाल्यातून बाहेर काढत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला होता. शवविच्छेदन अहवालात चिमुकल्याचा पाण्यात बुडवून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तालुका पोलीस ठाण्याचे एपीआय महेश सांगडे यांच्या फिर्यादीनुसार तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून परिसरातील स्थानिक नागरिकांकडे गुप्त चौकशी केली.

रागाच्या भरात हत्येची कबुली

पोलिसांनी तपासाची दिशा निर्दयी माता कल्पनाकडे वळवून तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता मुलगा आजाराने त्रस्त असून सतत रडून त्रास देत होता. त्यामुळे रागाच्या भरात त्याची हत्या केल्याची कबुली तिने पोलिसांना दिली. मात्र आरोपी कल्पनाचा नवरा निलेश हा धन, पैसा मिळेल या लालसेने तंत्रमंत्र व बुवाबाजीच्या आहारी गेल्याची माहिती समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वीही मोठ्या मुलाबाबतही असाच प्रकार केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रकार नरबळीचाही असावा, असा कयास  स्थानिकांकडून वर्तवला जात असून पोलीस त्या दिशेनेही तपास करीत आहेत.