Wed, Jun 23, 2021 02:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जितेंद्र आव्हाड आणि प्रताप सरनाईक तब्बल १२ वर्षांनी एकत्र! (video)

जितेंद्र आव्हाड आणि प्रताप सरनाईक तब्बल १२ वर्षांनी एकत्र! (video)

Last Updated: Sep 16 2020 2:17PM
ठाणे : पुढारी वृत्तसेवा 

एकेकाळचे खास मित्र आणि काही वर्षांपासूनचे राजकीय हाडवैरी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी बारा वर्षांनी पुन्हा एकदा मैत्रीची तार छेडली आहे. म्हाडाच्या माध्यमातून वर्तकनगर पोलीस वसाहतीचा पुनर्विकास करण्यात येणार असून याची घोषणा करण्यासाठी आव्हाड आणि सरनाईक एकत्र आले.

विशेष म्हणजे राष्ट्रवादी सोडल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी इतक्या वर्षांनी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात हजेरी लावली. पोलिसांच्या कुटुंबीयांनी आम्हाला पुन्हा एकदा एकत्र आणले अशी भावनिक प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली असून ये दोस्ती हम नही छोडेंगे असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा एवढ्या वर्षांनी मैत्रीची तार छेडली आहे.

अधिक वाचा: भाजप समर्थक माजी आमदार सीताराम घनदाट राष्ट्रवादीत

तब्बल बारा वर्षांपूर्वी म्हणजेच २००८ पूर्वी ठाण्यातील राजकारणात जितेंद्र आव्हाड आणि प्रताप सरनाईक म्हणजे ‘दो हंसो का जोडा’ म्हणून ओळखले जायचे. मात्र २००८ साली प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदाच्या वादावरून राष्ट्रवादीतून बाहेर पडत शिवसेनेचा रस्ता धरला. त्यामुळे आव्हाड आणि सरनाईक यांच्यातील मैत्री राजकारणामुळे दुभंगली गेली. मात्र आता तब्बल बारा वर्षानंतर पुन्हा एकदा वर्तक नगरमधील पोलिस वसाहतींच्या पुनर्निर्माण निमित्ताने गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि ओवळा माजिवडा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे आज एकत्र पत्रकार परिषद घेत आहेत.

नेमके काय घडले होते?

२००८ साली प्रताप सरनाईक यांच्या समता नगरमधील हॉटेलमध्ये ते राष्ट्रवादीतून बाहेर पडत असल्याची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती आणि ती गोष्ट होण्यापूर्वी आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड हे प्रताप सरनाईक यांची समजूत घालण्यासाठी पत्रकार परिषदेपूर्वी सरनाईक यांच्या हॉटेलमध्ये स्वतः आले होते. मात्र राष्ट्रवादीत राहिल्यास आपल्याला आमदार होणे शक्य नाही हे लक्षात आल्याने प्रताप सरनाईक यांनी आव्हाड यांच्या मनधरणीनंतरही शिवसेनेत प्रवेश करण्याची घोषणा केली. त्यामुळे आव्हाड आणि सरनाईक यांच्या काही दशकांच्या मैत्रीत खंड पडला. त्यानंतर खासगी कार्यक्रम वगळता कोणत्याही राजकीय व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जितेंद्र आव्हाड आणि प्रताप सरनाईक ते पुन्हा कधीही एकत्र आलेले दिसले नाहीत.

अधिक वाचा: कोव्हीशिल्डच्या मानवी चाचणीचा मार्ग मोकळा

त्यानंतर प्रताप सरनाईक तब्बल दोन वेळा ओवळा माजिवडा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले. २०१९ मध्ये सुदैवाने राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अशा तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडी विकास सरकार स्थापन केले. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे राज्याचे गृहनिर्माण खात्याचे मंत्रिपद आले आणि प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघातील वर्तक नगर येथील पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासाच्या प्रश्नाला गती मिळाली. 

पुन्हा छेडली गेली मैत्रीची तार

२०१४ साली राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर ही प्रताप सरनाईक हे वर्तक नगरमधील पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी प्रयत्नशील होते. त्याबाबत कालच मंत्रालयात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आमदार प्रताप सरनाईक आमदार यांच्या उपस्थितीत अंतिम मान्यता मिळाली. त्यामुळे बारा वर्षापूर्वी राजकारणामुळे विभक्त झालेल्या या दोघा मित्रांना पुन्हा एकदा वर्तक नगरमधील पोलीस वसाहतींच्या निमित्त्याने एकत्र पत्रकार परिषद घेण्याची संधी उपलब्ध झाली. त्यामुळे ठाण्याच्या राजकारणात पूर्वी ओळखला जाणारा हा ‘दो हंसो का जोडा’ पुन्हा एकदा मनोमिलन करत एकत्र येणार का याची उत्सुकता ठाणेकरांना आहे.

अधिक वाचा: पाकचा भंपक नकाशा बघून डोवालांचा सभात्याग

सरनाईक हे गेले ८ वर्षांपासून पोलीस वसाहतीच्या पुनर्विकासासाठी पाठपुरावा करत असून त्यांच्या या पाठपुराव्याला माझ्या सहीने पूर्ण विराम मिळाला असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. म्हाडाच्या माध्यमातून तब्बल १६०० घरे बांधण्यात येणार असून यातील ५६७ घरे पोलिसांना देण्यात येणार आहेत. तर १० टक्के घरे शासकीय कर्मचाऱ्यांना रखीव ठेवण्यात येणार असल्याचे आव्हाड यांनी संगीतले. राज्यात महाविकास आघाडी प्रमाणे ठाण्यातही पालकमंत्री एकनाथ शिंदे ,गृहनिर्माण  मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मी एकत्र काम करत असून पोलिसांच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा आम्हाला एकत्र आणले असल्याचे सरनाईक यांनी संगीतले.