Mon, Apr 12, 2021 03:01
गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे निधन

Last Updated: Apr 08 2021 2:31AM

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

गिरणी कामगारांच्या पुनरुज्जीवनाच्या लढ्याचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे मुंबईतील जे. जे .रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले, ते 72 वर्षाचे होते. गेल्या तीन-चार वर्षांपासून त्यांना दुर्धर आजाराने ग्रासले होते. बुधवारी सकाळी मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे त्यांना जे. जे .रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यापश्चात पत्नी चार मुले नातवंडे असा परिवार आहे.

मुंबईतील गिरणी कामगारांसाठी दोन ऑक्टोबर 1989 पासून इस्वलकर यांनी संघर्ष करण्यास सुरुवात केली. याच दिवशी गिरणी कामगार संघर्ष समितीची स्थापना केली. ते आजपर्यंत समितीचे अध्यक्ष होते. बंद पडलेल्या दहा गिरण्या 1988 - 90 च्या दशकात त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू केल्या. नंतर त्यांनी गिरणी कामगारांना स्वेच्छानिवृत्ती पोटी चांगले पैसे मिळवून दिले.

गिरण्यांच्या जागेवर कामगारांना घरे आणि रोजगार मिळाला पाहिजे म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांनी 1999 पासून आजपर्यंत संघर्ष केला. गिरण्यांच्या जागेवर आजपर्यंत 15000 कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी इस्वलकर यांचे मोठे योगदान आहे.