Thu, Oct 01, 2020 18:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा क्रांती ठोक मोर्चा विधानसभेच्या २८८ जागा लढविणार 

मराठा क्रांती ठोक मोर्चा विधानसभेच्या २८८ जागा लढविणार 

Published On: Jul 23 2019 6:28PM | Last Updated: Jul 23 2019 6:36PM
मुंबई : प्रतिनिधी

मराठा समाजाचे जे प्रलंबित प्रश्‍न आहेत. ते सोडवावेत या करीता विधानसभेत आवाज उठविण्यासाठी आगामी विधानसभेच्या 288 जागा लढविणार आहोत, अशी घोषणा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषद मंगळवारी केली. आजपर्यंत दोन्ही काँग्रेससह भाजप-शिवसेनेमध्ये असणार्‍या मराठा आमदारांनी स्वार्थ साधत स्वत:चा फायदा करुन घेतला. त्यामुळे विधानसभेत मराठा समाजाचे प्रश्‍न सोडविण्याची हिम्मत असणार्‍या युवक, महिलांना प्राधान्य दिले जाणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

आबासाहेब पाटील म्हणाले, मराठा समाजाने राज्यात आरक्षण मिळावे यासाठी ५८ मूक मोर्चा काढले . परंतु, राज्य व केंद्र सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. दरम्यान, मराठा समाज्याचा आरक्षणाचा प्रश्‍न न्यायालयात गेला. २७ जून २०१९ ला मराठा समाजाला न्यायालयातून न्याय मिळाला. परंतू शासनाने हवी तशी या आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही. यामध्ये अनेक बाबी आहेत. त्या अडचणीच्या बाबी निर्माण करुन ठेवल्या आहेत. यामध्ये २०१४ च्या मराठा विद्यार्थ्यांच्या  नियुक्तांच्या प्रश्‍न, विद्यार्थ्यांची फी माफी, प्रवेश प्रक्रिया, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेटर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. 

सर्वच राजकिय पक्षाने गेल्या ३५ वर्षात या समाजाला गाजर दाखवून वापर केला. यातून समाजाचे नुकसान झाले. म्हणून आता समाजातून समाजानेच ठरवलेले नेतृत्व या विधानसभेत उभे करणार आहे. प्रत्येक मतदार संघात मराठा समाजच उमेदवार ठरवतील. आरक्षण लागू झाल्यानंतर सरकारने दिलेली आश्‍वासने व शासकीय अधिकार्‍यांनी केलेली टाळाटाळ पाहता नोकरीमधील विद्यार्थ्यांवर अन्याय झाला. शिष्यवृत्ती वसतीगृह यातील एकही मागणी पूर्ण झाली नाही. 

राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर  पीककर्ज योजना, पीक विमा, कर्जमाफी, वीज बिलमाफ झाली नाही. यातून शेतकर्‍यांना संकटाला सामोरे जावे लागले. केंद्रसरकारने १३ हजार ५०० घरकुल योजनेतून घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये मराठा समाजाला ५० टक्के या योजनेतील घरे द्यावीत. सर्वच राजकिय पक्षांनी कोणी संघर्ष यात्रा,कोणी जनआशिर्वाद तर कोणी विजय संकल्प यात्रा काढल्या. यातून ते राजकिय फायदा पाहतात. मात्र शेतकरी व मराठा समाजाला कोणताच फायदा झाला नाही. म्हणून हा निर्णय घेतला आहे. या निवडणूकीसाठी विविध युवक संघटना, समविचारी संघटना यांच्याबरोबरही चर्चा करणार असल्याचेही  पाटील यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेस सुनील नागणे, रमेश केरे-पाटील, आकाश पाटील, छाया इंदूलकर, संगीता वानखेडे, आकाश पाटील , राजाभाउ कदम आदी उपस्थित होते.