होमपेज › Mumbai-Thane-Raigad › २२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप

२२० पेक्षा अधिक जागा महायुती मिळवील : भाजप

Published On: Sep 22 2019 1:33AM | Last Updated: Sep 22 2019 1:19AM
मुंबई : खास प्रतिनिधी

भाजप - शिवसेना महायुतीचे काम आणि संघटनात्मक तयारी याच्या बळावर आम्ही विधानसभा निवडणुकीत किमान 220 जागा जिंकून पुन्हा एकदा सरकार स्थापन करू, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणुका जाहीर झाल्यानंतर व्यक्त केला. तर हे सरकार बदललेच पाहिजे, ही जनतेची मानसिकता असल्याने 24 ऑक्टोबरला राज्यात परिवर्तन अटळ असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत जाहीर केल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना आत्मविश्वासाने आपणच जिंकणार असल्याचे सांगितले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला राज्यात मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता  महायुतीला 220 पेक्षाही  जास्त जागा मिळू शकतात.

आगामी निवडणूक भाजप देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली लढवणार असून  गेल्या पाच वर्षांत फडणवीस यांच्या सरकारने केलेले काम आम्ही जनतेसमोर मांडणार असल्याचे  पाटील यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षांत विविध निवडणुकांमध्ये भाजपला सातत्याने यश मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा सुरू असून लवकरच युतीची घोषणा होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

युती झाली तर बंडखोरीची अजिबात शक्यता नाही, असे सांगताना काहीजण नाराज झाले, तरी भाजप-शिवसेनेच्या संघटनात्मक फळीच्या माध्यमातून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला जाईल. असे त्यांनी सांगितले. सातार्‍याच्या पोटनिवडणुकीवरही भाष्य करताना उदयनराजे हे भाजपत आले असल्याने ते नक्कीच भाजपच्या विजयासाठी प्रयत्न करतील. सातार्‍याची पोटनिवडणूक विधानसभेसोबत होणार नसली तरी त्यातही भाजपच मोठ्या मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. एखादी पोटनिवडणूक घेणे हा निवडणूक आयोगाचा विषय असल्याने त्यांच्याकडूनच सातार्‍याच्या पोटनिवडणुकीबद्दल समर्पक उत्तर मिळू शकेल, असे ते म्हणाले. जरी पोटनिवडणूक लागली नसली तरी उदयनराजे हे भाजपचेच असल्याने  पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ते पूर्णपणे प्रयत्न करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

ज्वलंत प्रश्नांवर चर्चा व्हावी : अशोक चव्हाण

आगामी विधानसभा निवडणुकीत शेती, रोजगार, आर्थिक मंदी, ढासळलेली अर्थव्यवस्था अशा जनतेशी निगडित ज्वलंत प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे, असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी भाजप-शिवसेनेवर हल्लाबोल केला. राज्याच्या ज्वलंत मुद्द्यांवर भाजप-शिवसेना सरकार सपशेल अपयशी ठरले असून  हे अपयश लपवण्यासाठी कदाचित सरकार भावनिक मुद्दे उपस्थित करून जनतेचे लक्ष इतरत्र वळविण्याचा प्रयत्न करेल. पण काँग्रेसचे कार्यकर्ते सरकारला जनतेच्या रोजच्या जीवनातील ज्वलंत प्रश्नांवर उत्तर द्यायला भाग पाडतील, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.

काँग्रेस पक्ष निवडणुकांसाठी सज्ज असून काँग्रेस आणि मित्रपक्षांची आघाडी या निवडणुकीत विजयी होऊन नक्की सरकार स्थापन करेल, असा दावा त्यांनी केला.
11 कोटी सदस्य असल्याचा दावा करणार्‍या भाजपकडे सक्षम उमेदवार नसल्यानेच त्यांना काँग्रेस आणि इतर पक्षातून त्यांना मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागली,  काँग्रेस आघाडीची लढाई भाजप-शिवसेनेसोबतच पक्षांतर केलेल्या मंडळींशी होणार असून लोकांचा पक्षांतरावरील संताप या निवडणुकीत दिसून येईल, असे चव्हाण यांनी सांगितले.

24 ऑक्टोबरला परिवर्तन नक्की : नवाब मलिक

हे सरकार बदलले पाहिजे, परिवर्तन झाले पाहिजे या मानसिकतेत जनता आहे. त्यामुळे या निवडणुकीत 24 तारखेला निकाल येईल त्यावेळी महाराष्ट्रात परिवर्तन निश्चित होणार आहे, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी व्यक्त केला.