Wed, Jun 23, 2021 01:20
उच्च शिक्षणात महाराष्ट्र दुसरा

Last Updated: Jun 11 2021 2:11AM

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

उच्च शिक्षणात प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्याच्या संख्येत महाराष्ट्र दुसर्‍या स्थानावर आहे. उत्तर प्रदेशमध्ये 49.1 मुलगे तर 50.9 मुली उच्च शिक्षणात प्रवेश घेतात. तर राज्यात हे प्रमाण 54.2 टक्के मुलगे आणि 45.8 टक्के मुली असे आहे. त्या खालोखाल तामिळनाडू, राजस्थान, कर्नाटक या राज्यांचा क्रमांक आहे. 2015-16 ते 2019-20 या पाच वर्षांच्या काळात, विद्यार्थी पटसंख्येत 11.4 टक्यांनी वाढ झाली. याच काळात उच्चशिक्षणात मुलींच्या पटसंख्येत 18.2 टक्यांनी वाढ झाली आहे. तर उच्च शिक्षण विद्यार्थ्यांचे प्रमण 3.74 टक्क्यांनी वाढून 27.1 टक्के इतके झाले आहे.

शैक्षणिक वर्ष 2019-20 साठीच्या उच्चशिक्षण विषयक भारतीय सर्वेक्षण अहवालाला गुरुवारी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मंजुरी दिली. या अहवालात देशातील उच्चशिक्षणाच्या सद्यस्थितीविषयी माहिती असून, महत्वाच्या क्षेत्रांमधील कामगिरीचा ठळक उल्लेख करण्यात आला आहे.देशात उच्च शिक्षण घेणार्‍या मुलींच्या प्रमाणात सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र सर्वोच्च शिक्षण देणार्‍या राष्ट्रीय संस्थांमध्ये मात्र अद्याप मुलींचे प्रमाण कमी असल्याचे कायम आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने 2019-20मधील उच्च शिक्षणाचे सर्वेक्षण जाहीर केले आहे. यामध्ये मुलींचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढले आहे.

18 ते 23 या वयोगटात लोकसंख्या आणि त्यातील शिक्षण घेणार्‍यांचे प्रमाण याच्या आधारे ही टक्केवारी ठरविण्यात येते. महाराष्ट्रात हे प्रमाण 32.3 टक्के आहे. मुलींचे प्रमाण 31 टक्के तर मुलांचे प्रमाण 33.5 टक्के आहे. राष्ट्रीय स्तरावर नामांकित शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनींचे प्रमाण हे खूप कमी आहे. हे प्रमाण या सर्वेक्षणात 24.7 टक्के नोंदवले आहे. तर शासकीय अभिमत विद्यापीठांमध्ये हे प्रमाण 33.4 टक्के आहे. खाजगी विद्यापीठांमध्ये हे प्रमाण 34.7 टक्के आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्येही मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत कमी असल्याचे या सर्वेक्षणात समोर आले आहे.