Wed, Oct 28, 2020 10:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनसेच्या खळखट्याकमुळे फ्लिपकार्टचे ‘खास’ आश्वासन

मनसेच्या खळखट्याकमुळे फ्लिपकार्टचे ‘खास’ आश्वासन

Last Updated: Oct 19 2020 1:22AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ई-कॉमर्स कंपन्यांच्या ऑनलाईन शॉपिंग अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याची मागणी करत सात दिवसांनंतर खळ्ळखट्ट्याक आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर फ्लिपकार्ट कंपनीने यासंदर्भात सकारात्मकता दाखवली आहे. याउलट अ‍ॅमेझॉन कंपनीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. 

अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन कंपन्यांना अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा अंतर्भाव करण्यासाठी मनसेने सात दिवसांची मुदत दिला होता. दक्षिण भारतातल्या भाषांना प्राधान्य दिल्याप्रमाणेच महाराष्ट्रात व्यवसाय करण्यासाठी मराठी भाषेत अ‍ॅप सुरू करण्याची मागणी मनसेने केली होती. मराठीचा समावेश केला नाही, तर संबंधित कंपन्यांचा दिवाळीचा सण मनसे स्टाईलने साजरा करण्याचा इशारा दिला होता. कामगार सेनेचे सचिन गोळे आणि अखिल चित्रे यांनी मराठीचा समावेश नसल्याने अ‍ॅमेझॉनला माफी मागण्याची मागणीही केली होती. नाहीतर मनसे स्टाईल समाचार घेण्यात येईल, असा इशारा दिला होता. 

मनसेच्या इशार्‍यानंतर फ्लिपकार्ट कंपनीने ग्राहकांना नवनवीन आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आणि देशात ई-कॉमर्स सर्वदूर पोहोचवण्यासाठी स्थानिक भाषांचा समावेश करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, या उद्योगात लोकशाहीप्रमाणे काम करण्यास कंपनी कटिबद्ध आहे. विविध भागांत पोहोचण्यासाठी विविध भाषा आणि वॉईस सोल्यूशनचा वापर करण्यात येणार आहे. मातृभाषेच्या वापरामुळे मोठ्या संख्येने ग्राहक आकर्षित होतील आणि लघू व मध्यम उद्योजकांसह कारागिरांना एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल, असेही संबंधित प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. याउलट मनसेच्या इशार्‍यावर अ‍ॅमेझॉनकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.

 "