Sun, Sep 20, 2020 10:01



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दहा जूनपासून कोकण रेल्वे मार्गावर मान्सून वेळापत्रक लागू

दहा जूनपासून कोकण रेल्वे मार्गावर मान्सून वेळापत्रक लागू

Last Updated: Jun 06 2020 4:26PM

file photo



नवी मुंबई : पुढारी वृतसेवा 

लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू आणि श्रमिकांच्या घरवापसीसाठी अहोरात्र मेहनत घेतलेल्या कोकण रेल्वेने याच कालावधीत आपली मान्सूनपूर्व सुरक्षा उपाययोजनांची कामे पूर्ण केली आहेत. १० जूनपासून कोकण रेल्वेच्या मार्गावर मान्सून वेळापत्रक लागू होत असून, सुरक्षेचे उपाय म्हणून संपूर्ण मार्गावर ९७४ कर्मचारी २४ तास पेट्रोलिंगसाठी तैनात केले जात आहेत. पावसाळ्याच्या काळात संपूर्ण वहातूक सुरक्षित व्हावी यासाठी सुरक्षा उपाययोजनांची सगळी कामे कोकण रेल्वेकडून पूर्ण करण्यात आली आहेत.

मान्सूनच्या काळात बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव या तीन ठिकाणी नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहून रेल्वेच्या सुरक्षित वाहतुकीवर लक्ष ठेवून राहील. कोकण रेल्वेच्या मार्गावर मान्सून वेळापत्रक १० जून २०२० ते ३१ ऑक्टोबर २०२० या कालावधीसाठी कार्यान्वित राहील, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे. पावसाळयातील प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी कोकण रेल्वेने सर्व त्या सुरक्षा उपायांसह सज्ज झाली आहे.

मुसळधार पाऊस पडत असताना रेल्वेचा वेग ताशी ४० किमी असावा अशा सूचना लोकोपायलटला देण्यात आल्या आहेत, तर आपत्कालीन स्थितीत मदतीकरिता ॲक्‍सिडेन्ट रिलीफ मेडिकल व्हॅन रत्नागिरी आणि वेरना गोवा येथे तैनात ठेवण्यात आल्या आहेत. लोकोपायलट आणि गार्ड ना वॉकी टॉकी यंत्रणा पुरवण्यात आल्या आहेत. तसेच मार्गावर पूर्वी पासून एक एक किलोमीटर अंतराकार्यरत असलेली संपर्क यंत्रणा मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तपासून सज्ज करण्यात आली आहे. सॅटेलाईट सारखी अत्याधुनिक यंत्रणाही रिलीफ व्हॅनमध्ये सुसज्ज ठेवण्यात आली आहे.

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेकडून कोलाड ते ठोकूर या आपल्या ७४० किलोमीटरच्या पट्ट्यात मान्सून पूर्व कामांना काही दिवसांपूर्वी सुरवात करण्यात आली होती. यात प्रामुख्याने पावसात कोकण रेल्वेच्या मार्गावर पाणी येऊ नये यासाठी पाण्याचे मार्ग मोकळे करणे आणि मार्गा नजीकच्या कटिंगची पहाणी करून धोकादायक वाटणारी कटिंग काढून टाकणे याला प्राधान्य देण्यात आले. गेल्या काही वर्षात केलेल्या सततच्या उपाययोज़नांनी आणि घेतलेल्या खबरदारीमुळे गेल्या सात वर्षात मार्गावर दरड व माती येण्याचे प्रकार खूप कमी झाले आहेत.

मान्सूनच्या काळात आता संपूर्ण कोकण रेल्वेच्या मार्गावर ९७४ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून २४ तास गस्त घातली जाणार आहे. जी धोकादायक कटिंग आहेत, त्‍या ठिकाणी विशेष उपाययोजना केल्या गेल्या असून, या ठिकाणी २४ तास कर्मचारी तैनात  ठेवण्यात येणार आहेत. अशा ठिकाणांवर रेल्वेचा वेग ही नियंत्रित ठेवण्यात येणार आहे. आपत्कालीन स्थितीत तात्काळ मदत मिळावी यासाठी ठराविक अंतरांवर पोकलेन मशिन्स सारखी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहेत.

मुसळधार पावसाच्या काळात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्याची खबर देणारी यंत्रणा मार्गावर तीन पुलांवर ठिकठिकाणी सुसज्ज आहे. पुराचे पाणी धोकादायक पातळीच्या वर आल्यास ही यंत्रणा अलर्ट करते. याचबरोबर माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ आणि उडपी येथे पर्जन्य मापक यंत्रणा मार्गावरील ९ स्थानकात सुसज्ज असून अतिवृष्टी काळात ही यंत्रणा सूचना करेल.





 







"