Thu, Oct 01, 2020 18:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › इक्बाल मिर्चीची सुमारे ६०० कोटींची मालमत्ता जप्त

इक्बाल मिर्चीची सुमारे ६०० कोटींची मालमत्ता जप्त

Last Updated: Dec 13 2019 1:59AM
मुंबई : प्रतिनिधी

कुख्यात मोस्टवॉन्टेड डॉन दाऊद इब्राहीम याचा विश्वासू हस्तक ड्रग्जमाफिया इक्बाल मिर्ची याची तब्बल 600 कोटींची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी जप्त केली. इक्बालविरोधात सुरू असलेल्या मनीलाँड्रिंग चौकशी प्रकरणात ईडीने ही कारवाई केली असून अंडरवर्ल्ड जगतात खळबळ उडाली आहे. 

मुंबईच्या वरळीतील सीजे हाऊस इमारतीचा तिसरा आणि चौथा मजला, तसेच साहिल बंगल्यातील तीन फ्लॅट, ताडदेवमधील अरुण चेंबर्समध्ये असलेले कार्यालय, क्रॉफर्ड मार्केटमधील तीन व्यावसायिक दुकाने, बंगले आणि लोणावळ्यातील 5 एकरपेक्षा अधिक जमीन अशा मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे. या सर्व मालमत्तांची बाजारभावाने 600 कोटी रुपये किंमत असून या मालमत्तांवर कारवाई करण्यासाठी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) कायद्यांतर्गत दोन तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत.

दाऊदचा विश्वासू हस्तक आणि ड्रग्ज माफीया असलेल्या इक्बाल मिर्ची याचा 2013 साली लंडनमध्ये मृत्यू झाला. त्याआधीत त्याने अवैध धंदे, खंडण्या, ड्रग्ज तस्करीतून मिळवलेल्या पैशांतून वरळीसह ताडदेव, क्रॉफर्ड मार्केटसह मुंबईत, तसेच विदेशातही मोक्याच्या ठिकाणी करोडो रुपयांच्या मालमत्ता खरेदी केल्या. इक्बालची पत्नी आणि मुलांसह नातेवाईकांच्या नावाने या मालमत्ता असल्याचा आरोप ईडीने केला आहे. याप्रकरणात ईडीने विशेष न्यायालयात एका आरोपपत्रसूद्धा दाखल केले आहे. 

वरळीतील एका मालमत्तेचा विकास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रा. लि. कंपनीने केला होता. पटेल यांच्या कंपनीने येथे सीजे हाऊस नावाची 15 मजली इमारत बांधून इमारतीच्या तिसरा आणि चौथा मजल्यावरील तब्बल 14 हजार चौरस फुटांचा एरीया असलेले फ्लॅट इक्बालची पत्नी हजारा हिच्यासह जुनैद आणि आसीफ या दोन मुलांच्या नावावर केले. येथे इक्बालने फिशरमॅन व्हार्फ या नावाने एक डिस्कोथेक चालविणे सुरू केले. 

वरळीतील साहिल बंगला नावाच्या आणखी एका मालमत्तेत तीन फ्लॅट देखील इक्बालने ताब्यात घेतले. इक्बालची पत्नी हजारा, बहीण जैबुन्निसा मोहम्मद मेमन आणि भाऊ अस्लम मर्चंट यांच्या नावावर हे फ्लॅट करण्यात आले. त्यानंतर अस्लमने आपल्या नावावरील फ्लॅट गिफ्ट म्हणून तर, जैबुन्निसा हिने आपल्या नावावरील फ्लॅटचे शेअर्स इक्बालची पत्नी हजारा आणि मुलगा जुनैद यांच्या नावावर केले. त्यामूळे ही संपूर्ण मालमत्तासूद्धा इक्बाल कुटूंबियांच्या ताब्यात असल्याचा दावा ईडीने केला आहे. 

लोणावळ्यातील मालमत्ता इक्बालची पत्नी हजारा हिच्या नावावर होती. त्यानंतर मात्र 2005 साली या मालमत्तेचा ताबा इक्बालचा बालपणीचा मित्र ह्युमायू मर्चंट याच्या व्हाईट वॉटर डेव्हलपर्स लि. कंपनीकडे देण्यात आला. 2010 साली जुनैद आणि आसीफ या इक्बालच्या दोन्ही मुलांना कंपनीचे संचालक बनविण्यात आल्याचे ईडीचे म्हणणे आहे. तसेच याप्रकरणात ईडीने ह्युमायू यालाही यापूर्वी अटक करण्यात आली आहे.

ईडीच्या दुसर्‍या आदेशात, वरळीतील राबीया मेन्शन, मरियम लॉज आणि सी व्ह्यू या मालमत्तांचा समावेश आहे. सनब्लिंक या बांधकाम व्यावसायिक कंपनीने या मालमत्तांच्या हक्कांसाठी इक्बालसह अन्य संबंधितांना तब्बल 118.80 कोटी रुपये वाटले. त्यानंतर इक्बालला दुबई येथे आणखी 154 कोटी देण्यात आले आणि याच पैशांतून इक्बालने दुबईमध्ये एक हॉटेल खरेदी केल्याचा दावा ईडीने केला आहे. 

इक्बालचा मित्र आणि त्याचे व्यवहार पाहाणारा ह्यूमायू याने दुबईला जात सनब्लिंक आणि यूसुफ मोहम्मद ट्रस्ट यांच्या दरम्यान बोलणी करुन दिली होती. या मालमत्तांचे मालकी हक्क युसूफ मोहम्मद ट्रस्टकडेच आहेत. मात्र युसूफ ट्रस्ट इक्बालकडून चालविली जात असल्याचे बोलले जाते. याच व्यवहारामूळे दलाल रणजीतसिंह बिंद्रा आणि युसूफ ट्रस्टच्या हारून आलिम यूसुफ यानाही ईडीने याप्रकरणात यापूर्वी अटक केली आहे.

 "