Fri, Feb 26, 2021 07:12
विद्यापीठाला आता परीक्षेची घाई

Last Updated: Feb 24 2021 1:53AM

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई विद्यापीठाअंतर्गत असलेल्या बहुतांश महाविद्यालयांचे पदव्युत्तर पदवीचे प्रवेश सुरू आहेत. तर काही महाविद्यालयांमध्ये नुकतेच पार पडले. अशा परिस्थिती विद्यापीठाने 10 मार्चपूर्वी प्रथम वर्ष पदव्युत्तर पदवीच्या प्रथम सत्र परीक्षा पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र तोपर्यंत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार 90 दिवस पूर्ण होत नसल्याने ही परीक्षा पुढे न्यावी अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे.

मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयामध्ये जेमतेम 5 ते 6 आठवड्यांपूर्वीच प्रथम वर्ष पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू झाले आहेत. साधारण जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यापासून कला (एमए), विज्ञान (एमएससी), वाणिज्य (एम.कॉम) अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या अध्यापनाला सुरुवात झाली.  कोरोना प्रादुर्भावामुळे अंतिम वर्षाचे निकाल, प्रवेश प्रक्रिया, पहिल्या सत्राची परीक्षा सर्वच प्रक्रिया लांबणीवर गेली.

अद्यापही अनेक महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहेत. मात्र, तरीही विद्यापीठाने 10 मार्चपूर्वी परीक्षा संपवण्याच्या सूचना महाविद्यालयांना दिल्या आहेत. त्यानुसार महाविद्यालयांना किमान 1 तारखेपासून परीक्षा सुरू कराव्या लागतील. त्यामुळे राहिलेल्या चार-पाच दिवसांत अभ्यासक्रम उरकून विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घ्याव्यात असा प्रश्न प्राध्यापकांनी विचारला आहे. यातच अद्याप महाविद्यालय सुरू करण्यास महापालिकेने परवानगी दिली नसल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची प्रात्यक्षिके पार पडलेली नाहीत.