Mon, Apr 12, 2021 02:39
कोरोना झालेल्या मुलांची काळजी कशी घ्याल?

Last Updated: Apr 08 2021 4:15PM

अस्लम शानेदिवाण : पुढारी ऑनलाईन डेस्क

देशात कोरोनाची दुसरी लाट धडकली आहे. राज्यातही वाढत्या कोरोना रुग्णांचे प्रमाण पाहता विदारक चित्र निर्माण झालेले दिसत आहे. नवजात बालकं आणि बारा वर्षाखालील मुलं यांना कोरोना संक्रमणाचा अधिक धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पालक धास्तावले आहेत. त्यांच्या मनात, मला काही झालं तर माझ्या मुलांचं कसं होणार? माझ्यामुळे त्याला काही होणार तर नाही ना? असे असंख्य प्रश्न त्यांना पडत आहेत.

अशा परिस्थितीत पालकांनी कोरोनाला न घाबरता आपल्या मुलांचा कोरोनापासून बचाव कसा करावा, त्यांची कशी काळजी घ्यावी, डॉक्टरांचे सल्ले घेऊन योग्य उपचार कसे करावेत, याबाबत 'पुढारी ऑनलाईन'ने वैद्यकीय तज्ज्ञ आणि डॉक्टर शिषीर मिरगुंडे यांच्याशी बातचीत केली.

अधिक वाचा : 'कोरोना'नंतर कोरडा खोकला कशामुळे होतो? आणि त्यावर काय कराल उपाय... 

डॉक्टर मिरगुंडे सांगतात की, नवजात बालकं आणि बारा वर्षांखालील मुलांना कोरोनापासून वाचविण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता, योग्य आहार आणि डॉक्टरांचा योग्य सल्ला या बाबी महत्त्वाच्या आहेत.

कोरोनाचा प्रार्दुभाव पाहता जागतिक आरोग्य संघटनेने याला जागतिक महामारी म्हणून घोषित केले आहे. राज्यात आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण कमी होते. आधी बहुतांश बाधित लहान मुले ही लक्षणे विरहित होती. शिवाय त्यांना काही त्रासही जाणवत नव्हता. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ८८ हजार ८२७ लहान मुले बाधित झाली आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत राज्यात ६ हजार ७०४ बालके बाधित होती. त्याचे ३.१४ टक्के इतके प्रमाण होते. मात्र, यंदाच्या कोरोना काळात दहा वर्षांच्या आतील लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण ३.६१ टक्क्यांवर पोहोचले आहे. यामध्ये नवजात बालकांचाही समावेश आहे.

अधिक वाचा : कसा असावा कोरोना रुग्‍णांचा आहार ...

नवजात बालकांमध्ये कोरोना पसरत असतानाच त्याचा धोका ११ ते २० वयोगटातील मुलांमध्येही दिसत आहे. आजपर्यंत ११ ते २० वयोगटातील १ लाख ८७ हजार २८७ मुलं ही कोरोनाबाधित झाले आहेत. हे प्रमाण ६.६३ टक्के आहे. तर नवजात बालके आणि १२ वर्षांच्या आतील मुलांमध्ये ०.२ टक्के मृत्यूदर आहे. कुपोषित, हृदयरोग, जन्मजात फुप्फुसाचा आजार अशा लहान मुलांमध्ये हे प्रमाण अधिक आढळले आहे. ही बाब चिंताजनक आहे. घरातील मोठ्यांमुळे किंवा एकत्र खेळण्यामुळे लहान मुलांना संसर्ग होत आहे. पालकांनी याकडे लक्ष देऊन आणखी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये संसर्गाचा प्रसार अधिक वेगाने होत असल्याचे निदर्शनास येत आहे. लहान मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण काही जिल्ह्यामध्ये मागील लाटेपेक्षा जास्त आहे. लहान मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण प्रौढाइतके नसले तरी कुटुंबातील व परिसरातील इतरांना कोरोनाचा संसर्ग होण्याचे महत्वाचे वाहक असतात त्यामुळे नवजात अर्भक किंवा १० ते १२ वयोगटातील मुलांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कुटुंबातील सर्व पात्र व्यक्तींनी लसीकरण करून घ्यावे. तर नवजात अर्भक कोरोनाबाधित अथवा संशयित असल्यास मातेने त्यास स्वतः कोरोना संदर्भातील प्रतिबंधक दक्षता घेऊन स्तनपान करावे. पालकांनी त्यांच्या मानसिकतेला समजून घेऊन मुलांशी संवाद साधवा.
- डॉक्टर शिषीर मिरगुंडे
बालरोग तज्ज्ञ, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय

अधिक वाचा : घरीच राहा; पण फिट राहा...

कोरोना झालेल्या मुलांमध्ये दिसणारी लक्षणे -

१) नवजात बालकं आणि १२ वर्षांच्या आतील मुलांमध्ये  नाक वाहणे, खोकला होणे आणि घसा खवखवणे, ताप येणे असा त्रास होतो.
२) डोळे लाल होणे
३) जीभ लाल होऊन तोंड येणे
४) घशात खवखव आणि पुढच्या टप्प्यात श्वास घेण्यास त्रास होतो.
५) लहान मुलांच्या कानात संक्रमण होऊ शकते.
६) फुप्फुसात पसरल्यावर न्यूमोनिया होऊ शकतो.
७) तापाचे औषध घेऊनही ताप कमी न होणे.
८) अंगावर व्रण, पुरळ किंवा सूज येणे.
९) रक्तदाब कमी होणे.
१०) ह्रदयाच्या रक्तवाहिन्या सुजणे. 
वरीलप्रमाणे लक्षणे असली तरीही आजाराच्या निदानासाठी घशातील द्रवाचे नमुने पाठवावेत.

अधिक वाचा : जाणून घ्या स्तनांचे आजार

कोरोना झालेल्या मुलांची कशी घ्यावी काळजी -

१) नवजात बालकं आणि १२ वर्षांच्या आतील मुलाला कोरोना झाल्यास घशातील द्रवाचे नमुने पाठवावेत. तेसच अहवाल येईपर्यंत निगराणीखाली ठेवावे.
२) कोरोना झालेल्या बालकाला आणि १२ वर्षांच्या आतील मुलास इतरांपासून लांब ठेवावे.
३) त्याला घराबाहेर जाऊ देऊ नये.
४) हात-पाय स्वच्छ धुवावेत. त्यासाठी साबण व पाण्याचा वापर करावा. त्यांना हात धुतल्यावर पुसण्यासाठी दुसरा छोटा नॅपकिन ठेवावा.
५) कोरोनाबाधित बालक आणि १२ वर्षांच्या आतील मुलाचे कपडे रोजच्या रोज धुवावेत. ते वेगळे ठेवावेत.
६) प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी त्याला पौष्टिक आहार द्यावा, ‘व्हिटॅमिन सी’युक्त फळे द्यावीत, उदा. लिंबू, संत्रे, मोसंबी.
७) बाळामध्ये तीव्र ताप, सर्दी, खोकला झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
८) कोरोना काळात अथवा त्यानंतरही खोकला व ताप असल्यास आठवडाभर बाहेर पाठवू नये.
९) शाळेत पाठवू नये.
१०) लहान मुलांसाठी अल्कोहोलयुक्त हॅण्ड सॅनिटायझर वापरू नये.
११) भरपूर पाणी प्यायला देणे.
१२) जर नवजात बालक कोरोना बाधित असेल तर आई आणि ठराविक व्यक्तींशिवाय अन्य कोणत्याही व्यक्तीने हात लावू नये.
१३) माता आणि नवजात बालक हे दोघेही कोरोनाबाधित असले तरीही बाळाला आईचेच दूध पाजावे. म्हणजे विषाणूपासून संरक्षण होईल.
१४) बाळाला दिवसातून तीन वेळा स्वच्छ पुसून घ्यावे.
१५) वारंवार नाक तोंडाला स्पर्श करू नये, खोकताना थुंकीचे शिंतोडे वातावरणात पसरणार नाहीत, यासाठी रुमाल वापरायला देणे.