Tue, Sep 29, 2020 19:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुसळधार! महाड शहरात शिरले सावित्री नदीचे पाणी (video)

महाड शहरात शिरले सावित्री नदीचे पाणी (video)

Last Updated: Aug 04 2020 2:12PM

पावसामुळे महाड शहरातील सुकट गल्लीत सावित्री नदीचे पाणी शिरले.महाड (रायगड) : प्रतिनिधी

सोमवारी दुपारनंतर सुरू झालेल्या तुफानी पावसाने महाड शहरासह तालुक्यातील अनेक भागांत कहर केला. रात्रभर पडलेल्या पावसामुळे शहरातील सुकट गल्लीत सावित्री नदीचे पाणी शिरले. तर  गांधारी पूल परिसर मार्ग गांधारी नदीच्या पाण्यामुळे बंद झाला आहे. महाड नगर परिषद प्रशासनाने या भागात राहणाऱ्या नागरिकांना पुढील चोवीस तासांतील अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेऊन सुरक्षित ठिकाणी  जाण्याचा सल्ला दिला आहे.

गेली १५ दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी दुपारी साडेतीन वाजता दमदार हजेरी लावली. रात्रभर पावसाचा जोर सुरू होता .रात्री उशिरा  महाड शहरासह  रायगड वाळण बिरवाडी परिसरात पर्जन्यवृष्टी झाल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे. पोलादपूरमध्येही मुसळधार पाऊस सुरु आहे.

आज पहाटे महाड शहराच्या मच्छीमार्केट परिसरात  सावित्री नदीचे पाणी शिरण्यास  सुरुवात झाली. या  भागातील नागरिक व दुकानदारांनी सुरक्षेचा उपाय म्हणून आपल्या घरातील तसेच दुकानातील सामान हलविण्यास सुरुवात केल्याचे चित्र सकाळी या परिसराला दिलेल्या भेटीदरम्यान दिसून आले.

आगामी चोवीस तासांसाठी महाड नगर परिषद तसेच महाड आपत्ती  विभागाकडून नागरिकांना सूचना करण्यात आली आहे. येणाऱ्या चोवीस तासांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला असल्याने अत्यावश्यक कामे असतील तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, अशी सूचना महाड नगर परिषद व स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात येत आहेत.

गेल्या 24 तासांत 93 मिलिमिटर पावसाची नोंद झाली असून आजपावेतो 1303 मिलिमीटर पाऊस पडल्याची माहिती महाड आपत्ती नियंत्रण  विभागातून देण्यात आली आहे. दरम्यान, शहर अथवा तालुक्यात कुठेही  दुर्घटना घडलेली नाही.

 "