Sun, Aug 09, 2020 13:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा आरक्षणानुसार दिलेल्या वैद्यकीय प्रवेशावर आज सुनावणी

मराठा आरक्षणानुसार दिलेल्या वैद्यकीय प्रवेशावर आज सुनावणी

Last Updated: Jul 15 2020 1:36AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मराठा आरक्षणानुसार देण्यात आलेल्या वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला आव्हान देणार्‍या याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याचिकाकर्ते गुणवंत सदावर्ते यांनी या आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केली आहे. राज्य सरकार त्यावर आपली बाजू मांडणार आहे. तर मराठा संघटनांनी अनेक हस्तक्षेप याचिका दाखल केल्या असून, सरकार आणि मराठा संघटनांकडूनही वकिलांची मोठी टीम कोर्टात उभी राहणार आहे. 

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मराठा आरक्षणांतर्गत वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात आले होते. सुमारे अडीचशे विद्यार्थ्यांना या आरक्षणाचा लाभ झाला. या आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असता, उच्च न्यायालयाने हे आरक्षण कायम ठेवले. त्यावर या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे. मराठा आरक्षणावर निर्णय होत नाही तोपर्यंत या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी याचिकाकर्ते गुणवंत सदावर्ते यांनी केली आहे. मात्र, यापूर्वी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टात त्यावर निर्णय घेतला नाही.

15 जुलै रोजी सुनावणी होत असून, या सुनावणीची राज्य सरकारने तयारी केली असून, मराठा आरक्षणाचा दावा भक्कम करण्यासाठी नामवंत वकिलांची फौज उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रख्यात वकील कपिल सिब्बलही मराठा आरक्षणाच्या बाजूने युक्तिवाद करणार आहेत. राज्य शासनाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी व परमजितसिंग पटवालिया पूर्वीपासून बाजू मांडत आहेत. 

आरक्षणाच्या समर्थनार्थ हस्तक्षेप याचिका करणारे राजेंद्र डक यांच्या बाजूने कपिल सिब्बल लढणार आहेत. अन्य एक हस्तक्षेप याचिकाकर्ते कदम यांच्या वतीने वरिष्ठ विधिज्ञ रफिकदादासुद्धा बाजू मांडणार असून, विनोद पाटील यांनी त्यांच्या वतीने पी. एस. नरसिंहा युक्तिवाद करणार असल्याचे अगोदरच जाहीर केले आहे. याशिवाय मराठा महासंघाकडून ज्येष्ठ विधिज्ञ विनीत नाईक, अखिल मराठा फेडरेशनकडून शिवाजी जाधव हे बाजू मांडणार आहेत. याशिवाय अन्यही मराठा संघटनांनी हस्तक्षेप याचिका दाखल केल्या आहेत. त्यामुळे बुधवारी होणार्‍या या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.