Tue, Sep 29, 2020 09:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'एलओसी ते एलएसी पर्यंत भारतीय सैन्यांनी त्यांना धडा शिकवला'

'एलओसी ते एलएसी पर्यंत भारतीय सैन्यांनी त्यांना धडा शिकवला'

Last Updated: Aug 15 2020 12:40PM

पंतप्रधान नरेंद्र मोदीनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

एलओसीपासून ते एलएसीपर्यंत ज्यानेही देशाच्या सार्वभौमत्वावर आणि देशाकडे वाकड्या नजरेने पाहिले त्याला भारतीय सैन्याने त्यांच्याच भाषेत चोख प्रत्युत्तर दिले, असे म्हणत देशात सातत्याने सीमारेषेवर तसेच काश्मीरमध्ये कुरघोड्या करणाऱ्या दहशतवाद्यांसह पाकिस्तान तसेच चीनला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्लावरून सूचक इशारा दिला. भारताच्या सार्वभौमत्वाचा आदर हा सर्वोच्च आहे. यासाठी सीमारेषेवर जवान आपल्या प्राणांची बाजी लावतात. सैनिक आणि भारत काय करू शकतो हे लडाखमधील घटनेत जगाने पाहिले आहे, असेही ते म्हणाले.

वाचा : #IndependenceDay लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींचा चीन, पाकिस्तानला इशारा

७४ व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून सातव्यांदा देशाला संबोधित केले. ८६ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारतासह, शेजारी राष्ट्रांबद्दलचे धोरण यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. भाषणातून त्यांनी काही मोठ्या घोषणाही केल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत यंदा स्वातंत्र्यदिन सोहळा पार पडला. यंदा शाळकरी विद्यार्थ्यांऐवजी ५०० एनसीसी कॅडेट कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.

'मुले मोठी झाली की कुटुंबातील जेष्ठांकडून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे तसेच आत्मनिर्भर होण्याचा सल्ला दिला जातो. आपला देशाच्या स्वातंत्र्यांला इकती वर्षे झाल्यानंतर आता आत्मनिर्भर व्हायची गरज आहे', असे पंतप्रधान म्हणाले. कधीपर्यंत देश आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा माल फेकून त्यापासून तयार तयार झालेल्या वस्तू परत विकत घेत राहणार? आता आत्मनिर्भर व्हावेच लागेल, अशी भावना पंतप्रधानांनी यानिमित्ताने व्यक्त केली. भारतात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या सुधारणा जग बघत आहे. भारतात होणाऱ्या एफडीआय गुंतवणुकीचे सर्व रेकॉर्ड त्यामुळे मोडले आहेत. करोना संकटकाळातही भारतात मोठ्या प्रमाणावर, एफडीआय गुंतवणूक झाली आहे.

देशात कोरोनाच्या आधी एन-९५ मास्क, व्हेंटिलेटर, पीपीई किट बनत नव्हते. पंरतू,देशाने आपल्या उद्यमशीलतेने ते करुन दाखवले. आज आपण या गोष्टी निर्यातही करु लागलोय, असे ते म्हणाले. मागच्या वर्षी भारताने परकीय गुंतवणुकीचे (एफडीआय) सारे विक्रम मोडीत काढले. मागच्या वर्षी एफडीआयमध्ये १८ टक्के वाढ झालीय, असे ते म्हणाले. आपल्या देशात ज्या वस्तुंची निर्मिती व्हायची, त्याचे जगभरात कौतुक व्हायचे असा एक काळ होता. आत्मनिर्भर म्हणजे फक्त आयात कमी करणे नव्हे, तर भारतात बनवलेल्या सामानाचे सर्वत्र कौतुक झाले पाहिजे. मेक इन इंडियाच्या बरोबरीने आता 'मेक फॉर वर्ल्ड'साठी उत्पादने बनवायची आहेत, असेही मोदी म्हणाले. 

वाचा : #IndependenceDay: देशात कधी येणार कोरोनावरील लस; पंतप्रधान मोदींनी केली घोषणा 

अयोध्येत १० दिवसांपूर्वी भव्य राम मंदिर उभारणीचे काम सुरु झाले. अनेक शतकांपासून रामजन्मभूमीचा मुद्दा होता. शांततामय मार्गाने यावर तोडगा निघाला. देशातील जनतेचे आचरण अभूतपूर्व होते आणि भविष्यात यातून प्रेरणा मिळेल, असा विश्वास लाल किल्यावरून पंतप्रधानांनी व्यक्त केला. 

जगात भारताचे योगदान वाढणे काळाची गरज

भारत सध्या केवळ आपल्या गरजेपुरतेच अन्नधान्य पिकवत नसून, ज्यांना गरज असेल त्यांना देखील अन्नाचा पुरवठा करू शकेल अशा स्थितीत आहे. कृषी क्षेत्रात भारताने आत्मनिर्भर उद्दिष्ट साध्य केले आहे. आपल्याला मूल्यवर्धनाची आणि आपल्या कृषी क्षेत्रात आणखी परिवर्तनाची गरज आहे. संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे ही भारताची धारणा नेहमीच कायम राहिली आहे. ज्यावेळी आपण आर्थिक वृद्धी आणि विकास यावर लक्ष केंद्रित करत आहोत, त्यावेळी आपल्या या प्रवासात मानवता केंद्रस्थानी असलीच पाहिजे. जगामध्ये भारताचे योगदान वाढणे ही काळाची गरज आहे, यासाठी देशाला आत्मनिर्भर बनवणे गरजेचे आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

भारत अनेक देशांचा पोशिंदा

जगातील अनेक मोठ्या कंपन्या भारतात येत आहेत. आता देशाला 'मेक इन इंडिया' सोबत 'मेक फॉर वर्ल्ड' या मंत्रासह पुढे जायचे आहे. एक काळ होता, ज्यावेळी आपली शेतीव्यवस्था अतिशय मागास होती, तेव्हा देशवासियांचे पोट कसे भरणार ही सर्वात मोठी चिंता होती. आज आपण केवळ भारताचेच नाही तर जगातील अनेक देशांचे पोट भरु शकतो, असे मोदी यावेळी म्हणाले.

स्वत:च्या पायावर उभे राहणे अपरिहार्य

कोरोना संकटात 'आत्मनिर्भर भारत' हा १३० कोटी भारतीयांसाठी मंत्र बनला आहे. 'आत्मनिर्भर भारत' हे स्वप्न प्रत्यक्षात येणारच. देशातील तरुण, महिला शक्तीवर पूर्ण विश्वास आहे, असे मोदी म्हणाले. भारतासाठी स्वत:च्या पायावर उभे राहणे अपरिहार्य असून आपण निश्चितच हे स्वप्न पूर्ण करु. देशातील गुणवत्तेवर पूर्ण विश्वास आहे. आपल्या नागरिकांवर, युवकांवर आणि महिलांवर विश्वास आहे.भारताच्या दृष्टीकोनावर विश्वास असल्याचेही ते म्हणाले. वेदांमध्ये 'वसुधैव कुटुंबम' असे सांगण्यात आले आहे. तर, विनोबा भावे 'जय जगत' म्हणायचे. भारताने विश्व हेच आपले घर ही संकल्पना कायम जोपासली, असे ते म्हणाले.

सर्व कोरोना वॉरिअर्सना नमन

जे लोक विस्ताराच्या भूमिकेत मग्न होते, त्यांनी सर्व जगाला दोन महायुद्धांमध्ये होरपळून टाकले. मात्र अशा कालखंडातही भारताने स्वातंत्र्यांची लढाई चालू ठेवली. सर्व कोरोना योद्धांना पंतप्रधानांनी नमन करीत भाषणाला सुरुवात केली. कोरोना विरोधातील युद्धात अनेकांनी प्राण गमावले. पंरतू, या युद्धात देशाचा विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरोनाच्या संकटात आपल्या जीवाची पर्वा न करता, डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, रुग्णवाहिका कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचाऱ्यांसह अनेक लोक २४ तास सातत्याने काम करत आहेत. या सर्वांच्या कार्याची दखल पंतप्रधानांकडून घेण्यात आली.  कोरोनामहारोगराई काळात गरीबांसाठी ९० हजार कोटी खर्च करण्यात आले. देशातील तब्बल ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य वितरण करण्यात आल्याचेही पंतप्रधान म्हणाले.

वाचा : शत्रूच्या युद्धनौकांवर नौदलाची करडी नजर 

'नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन'ची घोषणा 

देशात आजपासून नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन सुरु होणार आहे. प्रत्येक भारतीयाला हेल्थ आयडी दिली जाणार आहे. या आयडीमध्ये आपली प्रत्येक टेस्ट, प्रत्येक आजार, कोणत्या डॉक्टरने कोणती औषधे दिली, केव्हा दिली, रिपोर्ट्स, अशी सर्व माहिती या हेल्थ कार्डमध्ये राहील.आरोग्य क्षेत्रासाठी ही मोठी क्रांती असेल. नागरिकांचा उपचाराचा खर्च कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, त्यासाठी प्रत्येकाला एक आरोग्य आयडी दिले जाईल. संबंधित नागरिकाच्या स्वास्थ्याबाबत त्यात माहिती असेल. यामुळे त्याला उपचार घेणे सोपे होईल, असे पंतप्रधान म्हणाले. या अभिनयानाअंतर्गत उपचारामध्ये येणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा सुविचारीत पद्धतीने विचार करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. हेल्थ आयडी प्रत्येक भारतीयाच्या स्वास्थ्य खात्याप्रमाणे काम करेल. यातून अनेक उपचारासंबंधित समस्या सोडवल्या जातील.‘इज ऑफ लिव्हिंग’चा मध्यमवर्गाला सर्वाधिक फायद झाला आहे. स्वस्त इंटरनेट ते इकोनॉमिकल हवाई तिकीट, हायवे ते आय वे, परवडणाऱ्या दरातील घरे ते कर कपात या सर्व उपायोजनांचा मध्यवर्गाला फायदा होईल, असे पंतप्रधान म्हणाले.

१००० दिवसांत प्रत्येक गाव ऑप्टिकल फायबरशी जोडणार

पंतप्रधान म्हणाले, वर्ष २०१४ च्या आधी देशात केवळ ६० पंचायती ऑप्टिकल फायबरशी जोडलेल्या होत्या. मागील पाच वर्षात देशात जवळपास दीड लाख ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरशी जोडल्या गेल्या. येत्या हजार दिवसांमध्ये देशातील प्रत्येक गाव ऑप्टिकल फायबरशी जोडल जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. 

प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहोचेल कोरोना लस 

कोरोनावर लस कधी येणार? हा सवाल आज प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे. भारतात या लसींची स्थिती काय आहे, याबाबत पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरील भाषणात माहिती दिली. कोरोनावरची लस कधी होणार? हा प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे. भारतात एक दोन नव्हे तर तीन-तीन लसी प्रगतीपथावर आहेत. वैज्ञानिकांनी लसीला हिरवा कंदिल दाखवल्यानंतर मोठ्या प्रमाणावर लसीचे उत्पादन सुरु होईल. कमीत कमी वेळेत कोरोनावरील लस प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याचा आराखडा तयार आहे, असे आश्वासन त्यांनी दिले. कोरोना मोठे संकट आहे, मात्र हे संकट इतके मोठे नाही की ते आपल्या आत्मनिर्भर भारताच्या प्रवासाला रोखू शकेल, असेही ते म्हणाले.

जगामध्ये भारताचे योगदान वाढणे काळाची गरज 

भारत सध्या केवळ आपल्या गरजेपुरतेच अन्नधान्य पिकवत नसून, ज्यांना गरज असेल त्यांना देखील अन्नाचा पुरवठा करू शकेल अशा स्थितीत आहे. कृषी क्षेत्रात भारताने आत्मनिर्भर उद्दिष्ट साध्य केले आहे. आपल्याला मूल्यवर्धनाची आणि आपल्या कृषी क्षेत्रात आणखी परिवर्तनाची गरज आहे. संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे ही भारताची धारणा नेहमीच कायम राहिली आहे. ज्यावेळी आपण आर्थिक वृद्धी आणि विकास यावर लक्ष केंद्रित करत आहोत, त्यावेळी आपल्या या प्रवासात मानवता केंद्रस्थानी असलीच पाहिजे. जगामध्ये भारताचे योगदान वाढणे ही काळाची गरज आहे, यासाठी भारत आत्मनिर्भर बनणे गरजेचे आहे,असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

 "