Wed, Aug 12, 2020 00:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्र भाजपमध्ये संघटनात्मक बदलाचे वारे; चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडेंना मिळणार मोठी जबाबदारी?  

महाराष्ट्र भाजपमध्ये संघटनात्मक बदलाचे वारे; चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडेंना मिळणार मोठी जबाबदारी?  

Last Updated: Jul 02 2020 1:44PM

चंद्रशेखर बावनकुळे आणि पंकजा मुंडेनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

निष्ठावंत कार्यकर्त्यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत डावलण्यात आल्यामुळे भाजपच्या अनेक दिग्गजांनी नाराजी व्यक्त केली होती. पंरतु, आता महाराष्ट्र भाजपमध्ये संघटनात्मक बदलाचे वारे वाहू लागले आहेत. अनेक निष्ठावंतांना पक्ष विस्ताराची महत्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच पंकजा मुंडे यांना संघटनेत मोठी जबाबदारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संभावित कार्यकारणीची यादी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे पाठवली आहे.  नड्डा यांच्या मंजूरीनंतर महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणी घोषित करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. बावनकुळे तसेच मुंडे यांना प्रदेश महामंत्रीपद देण्यात येणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
 
जुलै मध्यापर्यंत पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणी देखील घोषित होणार आहे. यात माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत पक्ष आयारामांवर मेहरबान झाल्याची टीका करण्यात आली होती. विशेष म्हणजे भाजप नेत्यांनीच अशाप्रकारची टीका केली होती. कार्यका​रणीत त्यामुळे निष्ठावंतांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. पक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मतदार संघ सोडणाऱ्या मेधा कुलकर्णी यांच्यासमवेत आशिष शेलार, देवयानी फरांदे यांची महामंत्रीपदी नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे तसेच एकनाथ खडसे यांच्या खांद्यावर पक्ष काय जबाबदारी सोपवणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

फेब्रुवारीत चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड झाली होती. त्यानंतर लगेच नव्या कार्यकारणीची निवड होणे अपेक्षित होते. पंरतु, कोरोना संकट तसेच लॉकडाऊनमुळे नव्या टीमची घोषणा लांबणीवर टाकण्यात आली. जुलैत उपाध्यक्ष, सचिव, सरचिटणीस, कोषाध्यक्ष तसेच विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आहे.