Wed, Jun 23, 2021 00:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजप समर्थक माजी आमदार सीताराम घनदाट राष्ट्रवादीत

भाजप समर्थक माजी आमदार सीताराम घनदाट राष्ट्रवादीत

Last Updated: Sep 16 2020 1:31PM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा 

गंगाखेड (परभणी) विधानसभा मतदारसंघातून २००९ मध्ये अपक्ष निवडून आलेले भाजप समर्थक माजी आमदार सीताराम घनदाट यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थित  त्यांनी पक्ष प्रवेश केला.

मुंबईतील काळाचौकी ही घनदाट यांची कर्मभूमी असून ते अभ्युदय सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपला समर्थन दिले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत घनदाट यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. गंगाखेड विधानसभेचे तिकीट देण्यासाठी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी प्रयत्न केला होता. पण त्यावेळी राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार मधुसूदन केंद्रे यांच्या जागी घनदाट यांना उमेदवारी देण्यात अडचणी आल्या. त्यामुळे घनदाट यांचा राष्ट्रवादी प्रवेश स्थगित झाला होता.

२०१९ च्या निवडणुकीतही ते अपक्ष रिंगणात उतरले होते. मात्र घनदाट आणि राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार मधुसूदन केंद्रे या दोघांनाही पराभवाची धूळ चाखावी लागली. राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड मतदारसंघातून बाजी मारली.

राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या घनदाट यांच्यासोबत परभणी जिल्हा परिषद सदस्य परभणी व अभ्युदय बँकचे संचालक भरत घनदाट, माधव ठवरे, लालया पठाण, अमित घनदाट, गणेश काळे, गौतम हत्तीअंबिरे, मधुसूदन लापटे, विनायक राठोड, दत्ताराव भोसले, दयानंद कदम, तुळशीराम शिंदे, विठ्ठल टोपे, डी. के. पाटील, विजयकुमार शिंदे, रावसाहेब शिंदे, शेखभाई चाऊस, शेख मुस्ताफा यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.