Thu, Oct 29, 2020 07:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › इतिहासात पहिल्यांदाच भाविकांविना घटस्थापना

इतिहासात पहिल्यांदाच भाविकांविना घटस्थापना

Last Updated: Oct 18 2020 1:03AM
मुंबई ः पुढारी वृत्तसेवा

कोरोनाचे सावट असूनही राज्यभरात शनिवारपासून नवरात्रौत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. राज्यातील मंदिरे बंद असल्याने यंदा प्रथमच घटस्थापनेची पूजा भाविकांविना झाली. 
मुंबईतील मुंबादेवी आणि कोल्हापुरातील महालक्ष्मीचे मुखदर्शन भाविकांनी मंदिराबाहेरूनच घेतले. अनेक मंदिरांनी ऑनलाईन दर्शनसेवा सुरू केल्याने भाविकांनी त्याचाही लाभ घेतला. 

करवीरनिवासिनी अंबाबाई  मंदिरात घटस्थापनेने शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला.  पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने देवस्थानच्या अधिकृत वेबसाईटचे डिजिटलायझेशन करून एका क्‍लिकवर भाविकांना दर्शनासह इतर सेवा उपलब्ध करून दिल्या. 

तुळजापुरात पहिल्यांदाच शुकशुकाट  

तुळजापूर : ‘आई राजा उदो उदो...’च्या जयघोषात आणि संबळाच्या नादात महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवी मंदिरात घटस्थापना झाली. कोरोनामुळे यंदा भाविकांची अनुपस्थिती जाणवत असल्याने इतिहासात पहिल्यांदाच तुळजापुरात शुकशुकाट आहे. पुजारी, मानकरी आदींच्या उपस्थितीत 9 दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. 

सप्‍तशृंगगडावर उत्साहात सुरुवात  

सप्‍तशृंगगड ः आद्य शक्‍तिपीठ असलेल्या वणीच्या सप्‍तशृंगगडावरही शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली. यात शनिवारी पहाटेपासून विविध धार्मिक पूजाअर्चा यासह महावस्त्र व देवीच्या अलंकारांची पूजा करत साधेपणाने मिरवणूक काढण्यात आली. गडावर साजरा होणारा देवीचा नवरात्रौत्सव कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रद्द झाला असला, तरी धार्मिक वातावरणात गडावर देवीची पंचामृत महापूजा झाल्यानंतर घटस्थापना करत आदिशक्‍तीच्या उत्सवाला प्रारंभ झाला. भाविकांसाठी देवी संस्थानच्या माध्यमातून यू ट्यूब तसेच संस्थानच्या फेसबुक पेजवरील  https://youtu.be/4-GliYbieBU या संकेतस्थळावर 24 तास ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.  

रेणापूरची रेणुकामाता 

रेणापूर ः येथे नवरात्र महोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट आहे. अशातच रेणापूर येथील रेणुकामाता येथे सकाळी तहसीलदार यांच्या उपस्थितीमध्ये विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. भाविकांच्या अनुपस्थितीत यंदा या नवरात्र महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. रेणापूर येथील रेणुकामाता हे केवळ लातूर जिल्ह्यातील नागरिकांचे नव्हे, तर उस्मानाबाद, बीड तसेच कर्नाटक येथील भक्‍तांचे श्रद्धास्थान आहे. 

 "