होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचा पूर्ण राज्यात प्रथमच वापर!

ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचा पूर्ण राज्यात प्रथमच वापर!

Published On: Sep 22 2019 1:33AM | Last Updated: Sep 22 2019 1:06AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

भारत निवडणूक आयोगाने राज्य विधानसभेची निवडणूक पारदर्शक होण्यासाठी संपूर्ण राज्यात पहिल्यांदाच ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. मतदारांमध्ये यासंबंधी जनजागृती करण्यासाठी सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून प्रत्यक्ष मशिनवर याबाबतची माहिती दिली जाणार आहे.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी ही माहिती दिली. मतदार जनजागृतीसाठी प्रत्येक मतदारसंघात ईव्हीएमची माहिती देण्यात येत आहे. निवडणुकीत सी व्हिजिल, सुविधा या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. नागरिकांना आचारसंहितेचा कुठे भंग होत असल्याचे दिसून आल्यास सी व्हिजिल या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून तक्रार करता येईल. तसेच राज्य व जिल्हास्तरावर संपर्क केंद्र स्थापण्यात आले असून तक्रार निवारणासाठी 1950 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी राज्यात 91 हजार 329 मतदान केंद्रे होती. यंदा यामध्ये 5325 मतदान केंद्रांची वाढ झाली आहे. दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांसाठी पहिल्या व दुसर्‍या मजल्यावरील मतदान केंद्रे खालच्या मजल्यावर आणण्यात आली आहेत. दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी, मतदान केंद्राचा शोध व व्हीलचेअरची सुविधा देण्यात  आली आहे.

निवडणूक कर्मचार्‍यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलिस दल सज्ज असल्याची माहितीही त्यांनी दिली.