Sat, Aug 15, 2020 16:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंतिम वर्षांच्या परीक्षा तूर्त नाहीच

अंतिम वर्षांच्या परीक्षा तूर्त नाहीच

Last Updated: Jul 14 2020 2:02AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत आग्रही असताना, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यात कोणत्याही परिस्थितीत विद्यापीठांच्या परीक्षा घेणार नसल्याचे सोमवारी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले. राज्य सरकार ठाम असल्यामुळे केंद्र आणि राज्य यांच्यात यावरून संघर्ष पेटणार, असे चित्र आहे.

राज्यात कोरोना संक्रमणाचा धोका वाढतच चालल्याने अंतिम वर्षांच्या परीक्षा घेणे अशक्य असल्याचे पत्र राज्य शासनाने ‘यूजीसी’ला पाठवले होते. केंद्र सरकारलाही विनंती केली होती. मात्र, त्याची दखल न घेता अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक व ‘यूजीसी’कडून आग्रही भूमिका घेण्यात आली. पोखरियाल यांनी अंतिम परीक्षा घ्याव्यात, असे आदेश दिले.

पोखरियाल यांच्या आदेशाच्या पाश्वर्र्भूमीवर सोमवारी सामंत यांनी मंत्रालयात तातडीने पत्रकार परिषद घेतली. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव  लक्षात घेता अंतिम वर्षांच्या परीक्षा घेणे शक्य नाही. सद्यस्थितीत परीक्षा घेणे हे विद्यार्थी,  प्राध्यापक आणि पालकांच्या जीवाशी खेळल्यासारखे होईल. आपत्ती व्यवस्थापन समितीने यापूर्वी परीक्षा न घेण्याचा घेतलेला निर्णय आपण कायम ठेवला आहे. या निर्णयाच्या संदर्भात तांत्रिक माहिती येत्या दोन दिवसांमध्ये दिली जाईल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

राज्यात अनेक महाविद्यालये क्वारंटाईन सेंटर्स करण्यात आली आहेत. अशा स्थितीमध्ये परीक्षा कशा घ्यायच्या, हे आम्हाला ‘यूजीसी’ने सांगावे, असेही सामंत म्हणाले. ‘यूजीसी’चे अध्यक्ष महाराष्ट्रातील आहेत. त्यांनी राज्यातील परिस्थिती समजून सांगणे आवश्यक आहे. देशाच्या भावी पिढीला कोरोनाच्या संकटात टाकणे योग्य नाही. तरीही ‘यूजीसी’ आग्रही असल्याने आता त्यांनीच परीक्षांसाठी मार्गदर्शन करावे, असा टोलाही त्यांनी लगावला.

आम्ही परीक्षेचा मुद्दा प्रतिष्ठेचा केलेला नाही; पण अंतिम वर्षांच्या परीक्षा घेऊ नये, यासाठी विद्यार्थी व प्राध्यापक संघटना आणि पालकांनीही विरोध दर्शविला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आम्हाला काळजी आहे. राज्यात आज 12 हजार 149 कंटेन्मेंट झोन आहेत. कोरोनाबाधितांची संख्या लाखोंवर गेली आहे. अशा स्थितीत परीक्षा घेणे शक्य नाही. राज्यातील परिस्थिती पाहून कोणाला परीक्षा घ्यावी, असे वाटत असेल त्यांनी सांगावे. त्यांना आम्ही संधी देणार आहोत. आमच्याकडे कुलगुरूंनी सरसकट पदवी देण्याची शिफारस केली आहे. सरासरीनुसार ग्रेड देऊन पदवी देणार आहोत. काही तांत्रिक बाबी असतील तर पुन्हा बैठक घेऊ. मात्र, आमच्या या निर्णयाला केंद्र व ‘यूजीसी’ने सहकार्य करावे, असे सामंत म्हणाले.

एटीकेटीसंदर्भात कुलगुरूंशी चर्चा

एटीकेटीसंदर्भात आपण राज्यातील सर्व कुलगुरूंसोबत चर्चा केली.त्याचा अहवालही आला आहे. दहा ते अकरा राज्यांतील सरकारांनी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली आहे. यामुळे आमच्या निर्णयाला ते विरोध करतील, असे वाटत नाही. परीक्षा रद्द झाल्या म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे सोडून देऊ नये. त्यांनी शिकत राहावे, असे आवाहनही सामंत यांनी केले.