Thu, Oct 01, 2020 18:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या

मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या

Last Updated: Dec 09 2019 1:14AM
मुंबई : प्रतिनिधी

दोन्ही मुलांची हत्या करुन 35 वर्षीय पित्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्‍कादायक घटना रविवारी सकाळी चेंबूरमध्ये उघडकीस आली. पती, पत्नीच्या वादातून ही घटना घडल्याचे समोर येत असून या घटनेने चेंबूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरसीएफ पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना ही घटना समोर आली. व्यवसायाने प्लंबर असलेले दिनेश सुरेश यादव (35) हे कुटूंबासोबत चेंबूरच्या वाशीनाक्यातील माहूल रोड, कस्तुरबानगरमध्ये राहात होते. त्यांचा भाऊसूद्धा याच परिसरात राहातो. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी दहाच्या सुमारास तो बाजारात जाण्यासाठी घराबाहेर पडला. दिनेश यांच्या घरासमोरुन जात असताना त्यांना घराचा दरवाजा बंद दिसला. सकाळचे दहा वाजले तरी घराचा दरवाजा बंद असल्याने दिनेशच्या भावाला संशय आला. त्याने बराचवेळ दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता. 

दिनेशचे पत्नीसोबत भांडण झाल्याने दोन  दिवसांपूर्वीच  ती  माहेरी निघून  गेल्याचे  भावाला  शेजार्‍यांकडून समजले. त्याने शेजार्‍यांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडला असता दिनेश हा छताच्या लोखंडी अँगलला काळ्या ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आणि त्याच्याजवळ मुलगी नेत्रा (3), मुलगा प्रणय (1 वर्षे 6 महीने) हे बेशुद्धावस्थेत पडलेले त्याला दिसले. दिनेशच्या भावाने  ही  माहिती  पोलिसांना  देत  तत्काळ  तिघांनाही  उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. आरसीएफ पोलिसांनी या घटनेची नोंद करून तिघांचेही मृतदेह  ताब्यात  घेत  शवविच्छेदनासाठी  पाठवले.  दिनेश  याचे त्याच्या पत्नीसोबत वारंवार खटके उडत होते. यालाच कंटाळून त्याने दोन्ही मुलांची हत्या करत स्वत: आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. 

 "