Mon, Sep 28, 2020 07:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडीच राहतील; गर्दी करू नका 

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडीच राहतील; गर्दी करू नका 

Last Updated: Mar 25 2020 10:52PM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. राज्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी असतील. त्यासाठी कोणत्याही ठराविक वेळा नसणार आहेत. भाजीपाल्याची आवक तसेच दुकाने बंद होणार नाही. त्यामुळे त्यासाठी गर्दी करू नका, असे आवाहन त्यांनी केले. 

सर्वांना आता कोरोना व्हायरस आणि त्याच्या गांभीर्याची पूर्ण कल्पना आली आहे. म्हणूनच घराबाहेर पडू नका, ही माझी सर्वांसाठी सूचना आहे. या सूचनेचे कारण म्हणजे या संकटाची तुलना मी आधीच जागतिक युद्धाशी केली आहे. युद्ध हे युद्ध असतं आणि तिथे आपला शत्रू हा नकळतपणे आपल्यावर वार करत असतो. शत्रू जेव्हा समोर नसतो तेव्हा संकट मोठं असतं. कारण हा शत्रू दिसत नाही आपल्याला. हा कोरोनाचा  शत्रू तसाच आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. 

घराबाहेर पडलं तर हा शत्रू कुठून हल्ला करेल सांगता येत नाही. घरामध्येच राहा. घराबाहेर आपण पाऊल टाकलं तर शत्रू आपल्या घरामध्ये पाऊल टाकेल. यामध्ये सकारात्मक काय आहे. मला बरेच फोन येतायत. सोशल मीडियावर आपण पाहतोय की, अनेक महिन्यांनी किंवा वर्षांनी कुटुंबं एकत्र आली आहेत. आई-वडील, आजी-आजोबा, मुलं, नातवंडं हे सर्वच एकत्र आले आहेत. कोणी वाचन करतंय, कोणी संगीत ऐकतंय, कोणी कॅरम खेळतंय. तर आपण जे गमावलं होतं ते यानिमित्ताने आपण आपली हौस भागवून घेत आहोत. वाईटातूनही काही चांगल्या गोष्टी घडत आहेत,  असं मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोनाचा विषाणू थंड वातावरणात अधिक काळ जगतो, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे उकाडा असला, तरी एसी वापरू नका, खिडक्या उघड्या ठेवा, स्वच्छ मोकळी हवा घरात येऊ द्या, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 

 "