Fri, Aug 14, 2020 13:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पवार, उद्धव यांच्याशी भेटीचा राजकीय अर्थ काढू नये : खडसे

पवार, उद्धव यांच्याशी भेटीचा राजकीय अर्थ काढू नये : खडसे

Last Updated: Dec 10 2019 10:24PM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

मी पक्षात नाराज नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची घेतलेली भेट ही राजकीय कारणातून नाही तर मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांसाठी राज्य सरकारकडून निधी मिळावा म्हणून होती. या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, असे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.

मुक्‍ताईनगर मतदारसंघात मुलीच्या झालेल्या पराभवावरून एकनाथ खडसे यांनी आपली खदखद व्यक्‍त केली आहे. पक्षाने योग्य कारवाई केली नाही तर वेगळा विचार करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यांनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. मंगळवारी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनही   खडसेंना पक्षात येण्याची आमंत्रणे दिली जात आहेत. 

खडसे यांनी मात्र आपण नाराज असल्याच्या बातम्याच चुकीच्या असल्याचे सांगितले. जळगाव जिल्ह्यातील बोदवड आणि शेळगाव प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाने मान्यता दिली आहे. साडेसहा हजार कोटींच्या या प्रकल्पासाठी राज्य सरकारची मान्यता व मदत आवश्यक आहे. त्यामुळे दिल्लीत शरद पवार यांची भेट घेऊन राज्य सरकारकडून या प्रकल्पांसाठी मदत देण्याची मागणी केली. उद्धव ठाकरे यांच्याकडेही हीच मागणी केली. दोघांनीही प्रकल्पाला मदत देण्याचे आश्‍वासन दिल्याचे ते म्हणाले 

भाजप नेत्यांनी आपल्या घेतलेल्या भेटी या मनधरणी करण्यासाठी नाहीत. या भेटीत राजकीय चर्चा जरूर झाली. पण, ती नवे सरकार सत्तेवर का आले आणि आपण का येऊ शकलो नाही? यावर झाली, असे त्यांनी सांगितले.