Thu, Jan 28, 2021 04:18
धनंजय मुंडेंवर कारवाईचे शरद पवारांचे संकेत, मुंडेंच्या भूमिकेकडे लक्ष 

Last Updated: Jan 14 2021 2:55PM

धनंजय मुंडेमुंबई : पुढारी ऑनलाईन

बलात्काराच्या आरोप प्रकरणी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मुंडेंवरील आरोपाचे स्वरुप गंभीर असून पक्ष म्हणून तातडीने निर्णय घ्यावा लागेल असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगत मुंडे यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत. दरम्यान, मुंडे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे आली आहे. (Cabinet Minister Dhananjay Munde facing rape allegation)

आपल्याबाबत शरद पवार आणि पक्ष निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे. ते आज राष्ट्रवादीच्या कार्यालयात दाखल झाले. येथे शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीत मुंडे यांच्याबाबतीत निर्णय होण्याची शक्यता आहे. 

तर पक्ष जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल, असे मुंडे यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर शरद पवार यांनी आपली भूमिका आज ( दि. १४ ) स्पष्ट केली. त्यांनी मुंडेंवरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यावर पक्ष म्हणून त्वरित निर्णय घेऊ, असे सांगितले. 

शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, धनंजय मुंडे यांनी आपल्यावर झालेल्या आरोपाबाबत माझ्याशी भेटून सविस्तर माहिती दिली. त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते. त्यातून काही तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाली. अशा प्रकारची घटना होईल असा अंदाज असल्याने धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालयातून न्यायालयीन आदेश प्राप्त केला होता. 

पण, जे आरोप झाले ते गंभीर स्वरुपाचे असल्याने एक पक्ष म्हणून त्यावर तातडीने विचार करण्याची गरज आहे. मी याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणार आहे. त्यांना धनंजय मुंडेंच्या या प्रकरणाविषयी सविस्तर माहिती देणार आहे. त्यांची मते जाणून घेत पुढील कारवाई करण्यात येईल, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. 

धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. कुणी आरोप केला म्हणून राजीनामा घेणार नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपावर धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भाजपकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यावर जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली. भाजप विरोधी पक्ष असून राजीनामा मागणं हे त्यांचे काम आहे. मुंडे यांच्यावर जे काही आरोप झाले आहेत त्याबाबत पक्ष पातळीवर चर्चा केली जाणार आहे. गरज भासली तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल, असे जयंत पाटील म्हणाले.

पण कुणी आरोप केला म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात अटक झाली आहे. या पार्श्वभूमीवर मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यावर बोलताना शरद पवार यांनी, नवाब मलिक हे राज्याच्या मंत्रिमंडळातील महत्वाचे नेते असल्याचे सांगत नवाब मलिक यांच्यावर कोणताही वैयक्तिक आरोप नसल्याचे स्पष्ट केले.