मुंबई : पुढारी वृत्तसेवा
राज्य शासनाच्या ‘ब्रेक दि चेन’ या मोहिमेविरोधात राज्यातील नाभिक समाजाने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळाने 10 एप्रिलला सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याची होळी करत राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
महामंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय अनारसे म्हणाले की, नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः लॉकडाऊनविरोधात असल्याचे सांगितले. तसेच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सलून व ब्युटी पार्लर पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले. मात्र 24 तास उलटल्यानंतरही कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही. तीन दिवसांत सरकारने निर्णय रद्द केला नाही, तर सलून व पार्लर चालक दुकानांसमोर आंदोलन करणार आहेत.
सलून व ब्युटी पार्लर बंद ठेवल्याने कारागिरांसह चालकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. सलून बंद ठेवल्यास आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे नागरिकांसह सलून व ब्युटी पार्लरचालक व कारागिरांचा वेळ ठरवून शासनाने सोमवार ते शुक्रवारी सकाळी 7 ते रात्री 8 यावेळेत व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महामंडळाने केली आहे.