Sat, Aug 08, 2020 13:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोस्टल रोडविरोधात मतदानावर बहिष्कार!

कोस्टल रोडविरोधात मतदानावर बहिष्कार!

Published On: Apr 21 2019 1:41AM | Last Updated: Apr 21 2019 1:41AM
मुंबई : तन्मय शिंदे

एकीकडे मुंबई उच्च न्यायालयाने कोस्टल रोडसाठी समुद्रात भराव टाकण्याचे काम रोखले असतानाच हा प्रकल्पच रद्द करा, या एकमुखी मागणीसाठी मुंबईतील वरळी कोळीवाड्यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

कोस्टल रोडला न्यायालयाने स्थगिती दिली असली तरी नियम मोडीत काढून कोस्टल रोडचे काम सुरू आहे. त्यामुळे माशांचा होणारा र्‍हास आणि मच्छीमारांच्या व्यवसायावर गदा आणण्याचा प्रयत्न सुरूच असल्याने वरळी कोळीवाड्यातील नागरिकांनी मतदानावरील बहिष्काराचे हत्यार शनिवारी उपसले. या बहिष्काराचे पोस्टर्स कोळीवाड्यांमध्ये लावण्यात आले असून, याशिवाय घरोघरी पत्रकेही वाटण्यात आली आहेत. आम्हा कोळी बांधवांच्या भवितव्याची काळजी नसणार्‍या पक्षांना या बहिष्कारातून अद्दल घडविण्यासाठी ही भूमिका घेतली असल्याचे वरळी कोळीनागरिकांकडून सांगण्यात आले. या बहिष्कार आंदोलनात वरळी कोळीवाडा नाखवा मत्स्य व्यवसाय सहकारी सोसायटी, नाखवा मच्छिमार को. ऑ. सोसायटी सहित वरळी कोळीवाडा, पर्यावरण प्रेमी, स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे.

कोस्टल रोडसंदर्भातील समस्या मांडण्यासाठी आम्ही प्रत्येक पक्षाकडे गेलो. मुख्यमंत्र्यांकडेही गेलो. मात्र, आम्हाला कोणी दाद दिली नाही. पाठिंबा आणि आश्‍वासना पलिकडे आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी आम्हाला न्यायालयात लढावे लागत आहे. आमची न्यायालयीन लढाई सुरू आहेच त्यात निवडणूक आल्याने आता मत मागण्यासाठी येणार्‍या उमेदवारांना आम्ही मतदान का करायचे, असा कोळी बांधवांचा प्रश्‍न आहे.

कोळी बांधवांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याचे समजताच शनिवारी संध्याकाळी पोलिसांकडून दबाव टाकण्यास सुरुवात झाली. बहिष्काराचे फलक काढण्यास सांगितले गेले. तसेच पुन्हा असे आंदोलन करू नका, असा इशाराही म्हणे देण्यात आला.

कोस्टल रोडसाठी किनार्‍यालगतच्या क्षेत्रात 200 ते 500 मीटर भराव घालण्यात येत आहे. रस्त्यासह गाड्यांचे पार्किंग, उद्यानांच्या योजना आखण्यात आल्या आहेत. हा भराव घालण्यास सुरुवात झाली आणि नोव्हेंबरपासून मार्चपर्यंत कोळंबी, जवळा, खेकडे, शेवण, बोंबील, बांगडे, पॉपलेट असे अनेक प्रकारच्या माशांची संख्या घटली आहे.

कोस्टल रोडसाठी हाजीआली, प्रियदर्शनी पार्क आणि वरळी सी फेज किंवा वरळी डेरीजवळ भर घातल्यामुळे ही अवस्था निर्माण झाली असून, हे असेच सुरू राहिले तर मच्छिमारांच्या मच्छिमारी व्यवसाय नामशेष होण्याची भीती मार्शल कोळी यांनी व्यक्त केली.