Wed, May 19, 2021 04:40
कोरोनाने अनाथ केलेली मुले परस्पर दत्तक देण्याचे प्रयत्न

Last Updated: May 05 2021 2:25AM

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

विध्वंसकारी कोरोनाच्या पहिल्या अन् दुसर्‍या लाटेत अनेक घरांचे खांब कलथले, कुटुंबे उघडी पडली. यात अनेक मुलांचे तर आई-वडील आणि भावंडेही कोरोनाने गिळंकृत केली. अशा अनाथ मुलांचा आकांत समजून घेत त्यांच्यावर मायेचे छत्र धरण्याऐवजी त्यांच्या दत्तक विधानाचा धंदाच काही प्रवृत्तींनी मांडला असल्याचे भयंकर चित्र समोर आले आहे. याची गंभीर दखल घेत कोरोनाने अनाथ केलेल्या मुलांसाठी महिला व बालकल्याण मंत्रालयाने विशेष मदत कक्ष स्थापन केला असून या मुलांना दत्तक घेण्यासाठी कुणी पुढे आल्यास कायदेशीर प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याची हमीदेखील मंत्रालयाने दिली आहे. 

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांची समाजकंटकांनी विक्रीच सुरू केल्याचे भयंकर चित्र सोशल मीडियावर समोर आलेले दिसते. त्यासाठी फेसबुक, व्हॉट्सप, इन्स्टाग्राम, ट्विटर आदी समाजमाध्यमांचा वापर करून भावनात्मक पोस्ट टाकल्या जात आहेत आणि ही अनाथ बालके दत्तक  घेण्यासाठी उपलब्ध असल्याचे या पोस्टमधून सांगितले जाते. दत्तक देण्याच्या नावाखाली हे समाजकंटक या बालकांची विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

अशी अनाथ बालके . आढळल्यास  मंत्रालयाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती व पोलीस यंत्रणेशी त्वरित संपर्क साधून या बालकांना त्यांच्या ताब्यात द्यावे. या सर्व मुलांची शासनामार्फत योग्य ती काळजी घेण्यात येईल. त्याशिवाय विशेष मदत कक्षाचीही स्थापना करण्यात आली आहे, असे  महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी पुढारीशी बोलताना  सांगितले.

दत्तक विधान प्रक्रियेची माहिती

बालक दत्तक घेण्यास इच्छुक असलेल्या पालकांसाठी कायदेशीर दत्तक विधान प्रक्रियेची सविस्तर माहिती केंद्र शासनाच्या ‘कारा’ (सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी) या प्राधिकरणाच्या www.cara.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्या आधारे हे पालक दत्तकासाठी अर्ज नोंदणी करू शकतात, असेही मंत्रालयातून सांगण्यात आले.