मुंबई ः पुढारी वृत्तसेवा
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला होता. राजकीय कार्यक्रम, पक्षाच्या बैठका रद्द करण्याचं आवाहनही त्यांनी केलं होतं. मात्र, काॅंग्रेसनं या आवाहानकडे दुर्लक्ष केलेलं दिसतं आहे. कारण, काॅंग्रेसने आपल्या नियोजित बैठका रद्द न करता मुंबईत बैठकीचं आयोजन केले आहे. त्यामुळे सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या काॅंग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाकडे स्पष्ट दुर्लक्ष केलेलं दिसत आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी (ता. २३) प्रदेश काँग्रेसच्या निवड मंडळाची (पार्लमेंटरी बोर्ड) बैठक मुंबईत होत आहे. महिला विकास महामंडळ, नरिमन पाईंट येथे होणाऱ्या या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. शेतकरी विरोधी काळे कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात आंदोलन व जनजागृती मोहिम राबविण्याबाबतही या बैठकीत रणनिती ठरवली जाणार आहे.
वाचा ः सुजातानं प्रेमात मला बरबाद केलंय...
या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह निवड मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.
वाचा ः 'त्या' घटस्फोट सोहळ्याचं रहस्य उलगडलं
राज्यातील आगामी ५ महानगरपालिका तसेच ९८ नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बांधणीसंदर्भात प्रदेशाध्यक्ष पटोलेंच्या अध्यक्षतेखाली २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीबरोबर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई काँग्रेसचे कार्यालय राजीव गांधी भवन येथे २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. नवी मुंबई शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, दुपारी १२ वा. कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, दुपारी २ वाजता वसई विरार जिल्हा काँग्रेस कमिटी व दुपारी ४ वा कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक घेतली जाणार आहे. तर गुरुवार दिनांक २५ रोजी औरंगाबाद ग्रामीण व शहर, भंडारा, गोंदिया व ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक होत आहे. शुक्रवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी यवतमाळ, चंद्रपूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक घेऊन संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला जाणार आहे. तर, संध्याकाळी ४ वाजता भिवंडी येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा होणार का याकडे लक्ष आहे.