Mon, Apr 12, 2021 03:04
९ वी, ११ वीच्याही परीक्षा रद्द; ३१ लाख विद्यार्थी थेट पास!

Last Updated: Apr 08 2021 2:51AM

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर पहिली ते आठवीप्रमाणे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्याही परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच उत्तीर्ण करून पुढील वर्गात थेट प्रवेश देण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. 

राज्यभरात नववीच्या 18 लाख आणि अकरावीच्या 13 लाख 22 हजार विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट होत असल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी हित लक्षात घेता, शालेय शिक्षण विभागाने राज्य मंडळाशी संलग्‍न असणार्‍या शाळांमधील नववी व अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. 

कोरोना काळात शाळा बंद असल्या, तरी शिक्षण प्रक्रिया चालूच होती. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने दीक्षा आधारित अभ्यासमाला, ज्ञानगंगा  या शैक्षणिक कार्यक्रमांचे डी.डी. सह्याद्री वाहिनीवरून प्रक्षेपण करून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात होते. मात्र, सध्याची परिस्थिती परीक्षा घेण्यायोग्य नाही. त्यामुळेच अंतर्गत मूल्यमापनावर आधारित विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याबाबत शाळांना सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाणार आहेत.