Tue, Mar 02, 2021 10:12
मुंबईत खासगी कार्यालयांत ५०% उपस्थिती

Last Updated: Feb 24 2021 2:09AM

मुंबई : पुढारी वृत्तसेवा 

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन मंत्रालयातील कामकाज दोन शिफ्ट्समध्ये करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मुख्य सचिवांना दिले. वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येईल याचे तत्काळ नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. दुसरीकडे मुंबईतील सर्व खासगी कार्यालयांना कर्मचार्‍यांची उपस्थिती 50 टक्केच ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

मुंबई महानगर प्रदेशात कोरोना झपाट्याने वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्‍त इक्बालसिंह चहल यांच्यासमवेत झालेल्या विशेष बैठकीत कोरोनाचा आढावा घेतला.  कर्मचार्‍यांच्या 50 टक्के उपस्थितीचे उल्लंघन केल्यास खासगी कार्यालयांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्‍तांनी स्पष्ट केले. मुंबईत  विवाह सोहळा, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम यामध्ये जास्तीत जास्त 50 व्यक्ती सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्व चित्रपटगृहे, नाट्यगृहे, उपाहारगृहांमध्येदेखील  एकूण क्षमतेच्या 50 टक्के व्यक्तींना परवानगी देण्यात आल्याचे आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

कार्यालयीन कामाच्या वेळा 10 ते 5 या चाकोरीतून बाहेर काढण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी नीतिआयोगाच्या बैठकीत मांडली होती. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग.दि कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, तसेच मंत्रालय अधिकारी संघटनेचे सरचिटणीस विष्णू पाटील, मुख्य सचिव संजय कुमार, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदींनी मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले, आपण या  नव्या पद्धतीच्या कामाची सुरुवात करून पाहू  ज्यामध्ये कामे पण संपूर्ण क्षमतेने व व्यवस्थित पार पडतील आणि कोरोनाचा धोकाही कमी राहील. दोन शिफ्ट्समध्ये मंत्रालयातील कार्यालयीन वेळांचे नियोजन कसे करता येईल ते महासंघाने पाहावे. मंत्रालयातील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांचे प्राधान्याने लसीकरण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले. एक दोन दिवसांत मंत्रालयात बाहेरून येणार्‍यांच्या प्रवेशावर निर्बंध घातले जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.